Tue, Jul 23, 2019 04:38होमपेज › Kolhapur › न्यू शाहूपुरीत दुमजली घराला भीषण आग

न्यू शाहूपुरीत दुमजली घराला भीषण आग

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

न्यू शाहूपुरी येथील पाटणकर कॉलनी परिसरातील भीषण आगीत चार घरांसह जनावरांचा गोठा भस्मसात झाला. संसारोपयोगी साहित्यासह सुमारे 17 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आगीत होरपळून म्हशीचा मृत्यू झाला. सुदैवाने मनुष्यहानी टळली. चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. बघ्यांची गर्दी झाल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते. सोमवारी दुपारी ही घटना घडली.

जयसिंग बनसोडे, सर्जेराव बनसोडे, रंगराव बनसोडे, शरद बनसोडे, रमेश बनसोडे यांची घरे आगीत भक्षस्थानी पडली आहेत. कडधान्ये, कपडे, टीव्ही, फ्रिज, कपाट, फर्निचर आदी साहित्यासह गोठ्यातील जनावरांचा वैरणसाठा खाक झाला आहे. आगीत म्हशीचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर एक गाय जखमी झाली आहे. आगीच्या ठिकाणी महिला खोलीत अडकून पडली होती. अग्‍निशमन दलाचे जवान व नागरिकांनी जीव धोक्यात घालून तिची सुटका केल्याने अनर्थ टळला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. सुमारे 17 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, न्यू शाहूपुरीतील पाटणकर कॉलनीलगत जुन्या कौलारू  दुजमली इमारतीत जयसिंग  बनसोडे, रमेश बनसोडे, सर्जेराव बनसोडे, रंगराव बनसोडे, शरद बनसोडे राहतात. घराला लागूनच गोठा आहे. दुपारी साडेबाराच्या सुमाराला आग लागली. गोठ्यातील कडबा, गंजीने पेट घेतला. काही क्षणात आगीचा भडका उडाला. इमारतीमधील जुन्या लाकडानेही लागलीच पेट घेतला. वार्‍यामुळे आग आणखी भडकली. बनसोडे कुटुंबीयांनी अग्‍निशमन दलाशी संपर्क साधून अग्‍निशमन दलाच्या बंबासह जवानांना पाचारण केले.

मुख्य फायर ऑफिसर रणजित चिले, मनीष रणभिसे, कांता बांदेकर, योगेश जाधव, अमित जाधव, कृष्णात मिठारीसह पंचवीसवर जवान व चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अखंडपणे पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात पथकाला यश आले. आगीत अत्यावश्यक संसारोपयोगी साहित्यासह कपडे, धान्य भस्मसात झाल्याने महिलांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. दुर्घटनेत मोठी हानी झाल्याचे चिले यांनी सांगितले. कॉलनीसह परिसरातील सामाजिक संस्था व नागरिकांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली आहे.
 

tags : Kolhapur,news,new, Shahupuri, house, fire,