Sat, Jul 20, 2019 15:38होमपेज › Kolhapur › अर्भक विक्रीचे आंतरराज्य रॅकेट

अर्भक विक्रीचे आंतरराज्य रॅकेट

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 08 2018 1:12AMइचलकरंजी : प्रतिनिधी

नवजात अर्भकांची लाखो रुपयांना विक्री करत असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या डॉ. अरुण भूपाल पाटील (वय 57, रा. जवाहरनगर) याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, डॉ. पाटील याच्या कारनाम्यामुळे इचलकरंजी शहराची बदनामी झाल्यामुळे त्याचे वकीलपत्र घेऊ नये, यासाठी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी इचलकरंजी बार असोसिएशनला निवेदन दिले. तर संशयित आरोपी डॉ. पाटील याला न्यायालयातून नेत असताना मनसेच्या महिलांनी त्याच्या अंगावर बांगड्या फेकून निषेध नोंदवला. त्यामुळे न्यायालयाबाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

दिल्ली येथील केंद्रीय पथकाला मिळालेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी डॉ. पाटील याला अटक केली आहे. डॉ. पाटील याने जवाहरनगर येथील जनरल सर्जिकल मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट 2017 मध्ये उपचारासाठी आलेल्या पीडित अल्पवयीन मुलीवर दवाखान्यात उपचार केले. शिवाय प्रसूतीनजीकच्या काळात तिला घरीच ठेवल्याची माहिती मिळाली. प्रसूतीनंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीने मुलास जन्म दिला. अपत्य जन्मानंतर चार दिवसांचे झाल्यानंतर संशयित आरोपी डॉ. अरुण पाटील, त्याची पत्नी सौ. उज्ज्वला अरुण पाटील यांनी छत्तीसगड येथील दाम्पत्याला ते दिले. त्यामुळे पीडित मुलीला पैशांचे आमिष दाखवून बाळाचा परित्याग करणे, अर्भक व माता यांना क्रूरपणे विभक्‍त करणे, दत्तक देण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता संगनमताने अर्भकाची दोन लाख रुपयांना विक्री केल्याची फिर्याद प्रभारी बालसंरक्षण अधिकारी सागर नामदेव दाते (वय 29) यांनी शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी डॉ. अरुण पाटील याला मंगळवारी रात्री अटक केली होती. यावेळी पोलिसांनी दवाखान्यातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी दवाखान्याबाहेर मोठा बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, बुधवारी सकाळी संशयित डॉ. पाटील याला तपासासाठी दवाखान्यात आणल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक विलास देशमुख, बालकल्याण समिती अध्यक्षा प्रियदर्शनी चोरगे, समाजसेविका डॉ. प्रमिला जरग, बालसंरक्षण अधिकारी सागर दाते यांच्यासह पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्यासह पथकाने बुधवारी सकाळी डॉ. पाटील याच्या दवाखान्याची झडती घेतली. यावेळी इंदिरा गांधी इस्पितळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सूर्यवंशी पथकासोबत होते. पोलिसांनी दवाखान्यातील काही कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी सोनोग्राफी मशिनसाठी आवश्यक असलेली परवानगी व प्रसूतीनंतरचे रेकॉर्ड ताब्यात घेतले. तपासादरम्यान सोनोग्राफीचे मशिन कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे सुमारे एक वर्षे  बंद असल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे पीडित कुमारी मातेची प्रसूती 3 डिसेंबर रोजी झाल्याचे व त्यापूर्वी शहरातील एका सोनोग्राफी सेंटरमध्ये तिची तपासणी झाल्याची माहिती पाटील याने पथकाला दिली. त्यामुळे पथकाने शहरातील त्या सेंटरची तपासणी करून आवश्यक ती माहिती घेतली.

दरम्यान, पोलिसांनी डॉ. पाटील याला न्यायालयासमोर हजर केले. यावेळी सरकारी वकिलांनी डॉ. पाटील याने केलेला गुन्हा समाजव्यवस्थेच्या विरोधात असून त्याची व्याप्‍तीही मोठी असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. शिवाय छत्तीसगड येथील माता-पिता डॉ. पाटील याच्या दवाखान्यात आलेच कसे, यापूर्वी ते दवाखान्यात आले होते का किंवा कोणाच्या मदतीने ते या ठिकाणी आले, याची माहिती घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. नवजात अर्भकाची छत्तीसगडमध्ये विक्री केली आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी व या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, दोन लाख रुपयांचा विनियोग कोणत्या कारणांसाठी झाला आहे, त्याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. यावेळी संशयित आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुनील कुलकर्णी यांनी युक्‍तिवाद केला. न्यायालयाने डॉ. पाटील याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली.

डॉ. पाटील याला न्यायालयात हजर केल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांना समजली. डॉ. पाटील याच्या कृत्याने इचलकरंजी शहराची बदनामी झाल्यामुळे त्याचे वकीलपत्र कोणीही स्वीकारू नये, असे निवेदन इचलकरंजी बार असोसिएशनला देण्यात आले. डॉ. अरुण पाटील याला न्यायालयातून बाहेर नेताना त्याला बांगड्यांचा आहेर देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या मारामारीच्या संशयित आरोपींच्या घोळक्यातूनच त्याला पोलिस व्हॅनमध्ये बसवण्यात आले. पोलिसांनी डॉ.पाटील याला न्यायालयातून पोलिस ठाण्याकडे पोलिस व्हॅनमधून नेत असताना न्यायालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यांनी व्हॅन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील याला बांगड्यांचा आहेर देण्याचा प्रयत्न केला.