Thu, Jun 27, 2019 10:17होमपेज › Kolhapur › नेट-सेटधारकांसमवेत उद्या शिक्षणमंत्र्यांची मुंबईत बैठक

नेट-सेटधारकांसमवेत उद्या शिक्षणमंत्र्यांची मुंबईत बैठक

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

नेट-सेट पात्रताधारकांच्या मागण्यांबाबत सोमवारी (दि. 11) मुंबईत आंदोलकांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलकांशी शनिवारी झालेल्या 
चर्चेत स्पष्ट केली. नेट-सेट पात्रताधारकांनी मंत्री तावडे यांची सर्किट हाऊस येथे भेट घेतली व समस्या मांडल्या. यावेळी ते बोलत होते. प्राध्यापक भरतीसंदर्भात शासनाकडून लवकरच आदेश काढला जाणार असल्याची माहिती यावेळी मंत्री तावडे यांनी दिली. 

आंदोलकांनी मंत्री तावडे यांच्यासमोर समस्या मांडताना सांगितले की, प्राध्यापक भरती बंदी तत्काळ उठवा. आमचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण तत्काळ लेखी आदेश काढावा. यावेळी मंत्री तावडे म्हणाले, तुम्ही आंदोलन केले नसले तरीही जुलै महिन्यात प्राध्यापक भरतीचा आदेश सरकारच्या वतीने काढला जाणार होता. आम्ही प्राचार्य भरतीचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता प्राध्यापक भरतीबाबत प्रक्रिया सुरू आहे. राज्यात 70 हजार नेट-सेट पात्रताधारक आहेत. त्यामुळे भरती केली जाणार आहे. हा विषय सध्या वित्त विभागाकडे आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल.  यावेळी मागण्यांचे निवेदन आंदोलकांच्या वतीने मंत्री तावडे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात डॉ. किशोर खिलारे, डॉ. इब्राहिम मुलाणी, डॉ. रामेश्‍वर कांबळे, डॉ. खंडेराव खदळकर आदींचा समावेश शिष्टमंडळात होता. 

मी हवेत बोलत नाही..

प्राध्यापक भरती करणार असे लेखी लिहून द्या, अशी मागणी मंत्री तावडे यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. यावेळी मंत्री तावडे संतप्त झाले. ते म्हणाले, मी कधीही हवेत बोलत नाही. खोटे बोलत नाही. माझ्या शब्दांवर विश्‍वास ठेवा. तुम्ही आंदोलन करणार असेल तर करा. मी निर्णय घेतला आहे. हवे तर तुम्ही अर्थ विभागाकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मागून खात्री करा. आंदोलन हा तुमचा अधिकार आहे. त्याविषयी मी काही बोलणार नाही. परंतु, विद्यार्थ्यांना  नेट-सेट पात्रता असलेले चांगले प्राध्यापक मिळावेत म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे.