होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात डासमुक्त गावांची मोहीम गरजेची

जिल्ह्यात डासमुक्त गावांची मोहीम गरजेची

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 26 2018 11:24PMकोल्हापूर : विजय पाटील

कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांत डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्यूच्या प्रादुर्भावाने नागरिकांना सळो की पळो करून सोडले असतानाही अद्याप सरकारी यंत्रणेसह समाजसेवेचा आव आणणार्‍या स्वयंसेवी संस्थाही या विषयावर मूग गिळून गप्प आहेत. डेंग्यूचा प्रसार पाहता भविष्यातही डासांपासून होणारे डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार वाढतच राहतील. यातून मुक्ती मिळवायची असेल, तर बीड, नांदेड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सुरू असलेल्या डासमुक्त गाव व प्रभागांची मोहीम राबवणे गरजेची आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम सहज रुजेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी 100 च्या वर गावे डासमुक्तीच्या दिशेने नेऊन दाखविली. मुळात ही संकल्पना हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी गावचे सरपंच प्रल्हाद पाटील यांची. त्यांनी आपल्या गावात डासमुक्त गावाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. यानंतर हिमायतनगर, हदगाव, भोकर, लोहा आदी तालुक्यांत हा उपक्रम रुजला व यशस्वी झाला. 

बीड जिल्ह्यातील सांगळवाडी गावानेही डासमुक्तीचा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीस गावांत डासमुक्तीचा प्रयोग सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील नायगाव हे गावसुद्धा शंभर टक्के डासमुक्त म्हणून आदर्श ठरले आहे. गोंदिया जिल्ह्यातही डासमुक्तीचे उपक्रम यशस्वी सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शोषयुक्त खड्डे आणि डासमुक्त गावांची संकल्पना वेगात सुरू आहे. जिल्हा परिषद, महापालिका  व स्थानिक राजकीय मंडळींनी मनात आणलं, तर लोकसहभागाच्या सहाय्याने डासमुक्त गाव, तालुका आणि जिल्हा सहजशक्य आहे. कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त योजनेत देशात नावाजला आहे. त्यामुळे डासमुक्त गाव ही संकल्पना येथे सहज रुजवता येईल. 

जनजागरणाची लक्ष लक्ष मोहीम उभारणे आवश्यक!

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

अत्यंत सावधपणे शिरकाव केलेल्या आणि नागरिकांना लिलया आपली शिकार बनविण्यात तरबेज झालेल्या डेंग्यूचा विळखा कोल्हापूर शहराभोवती घट्ट बनतो आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेमध्ये कोल्हापुरात सरकार दफ्तरी नोंद असलेल्या डेंग्यूूबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये चालूवर्षी पाच पटीने वाढ झाली आहे. या विषाणूने अनेक निष्पापांचे बळी घेण्यासही मोठी मजल मारल्याने नागरिकांची आता डेंग्यूपासून मुक्तता करण्यासाठी शहरात स्वच्छतेचे लक्ष लक्ष अभियान उभारण्याची गरज आहे; अन्यथा डोळ्यास पुसटसा दृष्टिपथात दिसणारा आणि सहजी हातात न येणारा हा छोटासा डास कोल्हापूर शहराचे सार्वजनिक आरोग्य धोक्याच्या वळणावर नेऊन ठेवण्यास कारणीभूत ठरू शकतो. 
कोल्हापूर शहरात काही वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापनाचा उडालेला बोजवारा, ड्रेनेज व्यवस्थेची अकार्यक्षमता आणि जागोजागी उभारलेले कचर्‍याचे ढीग यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव मोठा होता. यानंतर महापालिकेने शहरातील कोंडाळे हलविण्यास सुरुवात केली आणि ड्रेनेज व्यवस्थाही काहीअंशी सक्षम करण्यात यश मिळाले. यामुळे मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी होत चालली असताना आता गेल्या चार वर्षांमध्ये डेंग्यूने आपले डोके वर काढले आहे. स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालून आपला संसार फुलविणार्‍या या डासाने कोल्हापुरात अनेक निष्पापांचे बळी घेतले आहेत. हातातोंडाला आलेली तरुणाई डेंग्यूने मृत्युमुखी पडत असल्याचे दुर्दैवी पाहणे कुटुंबीयांच्या नशिबी येते आहे. साहजिकच, रुग्णाचा मृत्यू वा त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर रिकामा झालेला खिसा पाहून नागरिकांतून काही तात्कालिक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत. यामध्ये परंपरेने शासनाला जबाबदार धरण्याची वृत्तीही दिसते आहे. परंतु, डेंग्यू या रोगाच्या फैलावाची 90 टक्क्यांहून अधिक जबाबदारी नागरिकांची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मानवनिर्मित या रोगाला आळा घालण्यासाठी जोपर्यंत नागरिक रस्त्यावर उतरणार नाहीत, तोपर्यंत डेंग्यूच्या बळीची ही मालिका खंडित होणे अशक्य आहे.

कोल्हापूर शहरामध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावाविषयी 2015 सालापासून शासकीय दफ्तरी नोंदीवर नजर टाकली, तर हा विळखा किती घट्ट होतो आहे याची कल्पना येऊ शकते. 2015 साली शहरात 36 नागरिकांना डेंग्यूची बाधा झाली होती. 2016 व 2017 मध्ये रुग्णसंख्येचा हा आकडा अनुक्रमे 99 व 203 वर पोहोचला. तर 2018 च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ही डेंग्यूबाधित रुग्णसंख्या 1069 वर जाऊन पोहोचली आहे. 

अर्थात, ही शासकीय दफ्तरातील माहिती असली, तरी शहरातील एकूण डेंग्यूचा वाढता प्रभाव लक्षात घेता यापेक्षा कितीतरी पटीने अधिक रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचे आणि डेंग्यूने बळी पडले असल्याची माहिती समोर येते आहे. हे सर्व मानवनिर्मित संकट आहे. यामुळे जोपर्यंत या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून स्वच्छतेची मोहीम राबविण्यास पुढाकार घेत नाहीत, तोपर्यंत कोल्हापूरच्या सार्वजनिक आरोग्यावर टांगती तलवार कायम राहणार आहे.     (क्रमशः)