Sat, Jul 20, 2019 11:09होमपेज › Kolhapur › सरकारविरोधी संघर्षाला तयार व्हा

सरकारविरोधी संघर्षाला तयार व्हा

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 03 2018 11:49PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

सर्वच बाजूंनी फसवणूक करणारे भाजप सरकार उलथविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून संघर्षासाठी तयार व्हा, असे आवाहन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादीतर्फे दोन आणि तीन एप्रिलला सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

नोटाबंदीपासून जीएसटी लादण्यापर्यंत सरकारने अनेकप्रकारे सर्वसामान्यांचा आर्थिक छळ केल्याचा आरोप करून आ. मुश्रीफ म्हणाले की, ज्या आशेने हे सरकार आणले गेले त्या सर्व आशांवर पाणी फिरले आहे. महागाई कमी झाली नाही. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडली. उद्योग-व्यवसाय अडचणीत आले. रोजगार बुडाले. केंद्रातील भाजप सरकारने देशाचे आणि मुखत्वे देशवासीयांचे अपरिमित नुकसान केले आहे.

महाराष्ट्रातही सत्तेवर असणार्‍या भाजप सरकारमध्ये राज्य चालविण्याची धमकच नाही, असे स्पष्ट करून मुश्रीफ म्हणाले की, सत्तेवर आल्याबरोबर राज्याची आर्थिक स्थिती न पाहता केवळ प्रसिद्धीसाठी काही निर्णय घेतले. महामार्गावरील अनेक टोल नाके बंद केले. एल.बी.टी. हटविली. न झेपणारी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. आपल्या तिजोरीत किती रक्कम आहे आणि त्यानुसार काय कपात केली पाहिजे, याचा काडीमात्र अभ्यास सरकारने केला नाही. टोल नाके, एलबीटी रद्दमुळे राज्याचे सुमारे 34 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. हेच जर अभ्यासपूर्ण निर्णय घेतले असते आणि ते घेण्यापूर्वी काही दिवस थांबून आदेश काढले असते, तर तिजोरीत रक्कम साठली असती. कशाचाच अभ्यास नसणार्‍या मुख्यमंत्र्यांपासून सरकारमधील अनेक मंत्र्यांचे निर्णय सतत चुकत आहेत.
सार्वजनिक बांधकाम आणि महसूल ही दोन अत्यंत महत्त्वाची खाती कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहेत. या खात्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट करता आला असता. मी जर या दोन खात्यांचा मंत्री असतो, तर जिल्ह्यातील रस्ते काचेचे केले असते, असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. ना. पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासापेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आकसाने कारवाई करण्यात लक्ष घातले, असा आरोपही केला. आता हे सरकार हटविण्याची संधी आली आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागले पाहिजे.सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलन  यशस्वी करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

आ. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हाभर नियोजन करावे, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार यांनी केले. आ. मुश्रीफ वाढदिवस तयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. 24 मार्चला वाढदिवस असून, ते कागल येथे दिवसभर शुभेच्छा स्वीकारणार आहेत. त्यानंतर ते गडहिंग्लजला जाणार आहेत.