होमपेज › Kolhapur › अहो.. मामाची मुलगी दाखवलीच नाहीः शरद पवार

अहो.. मामाची मुलगी दाखवलीच नाहीः शरद पवार

Published On: Feb 11 2018 4:53PM | Last Updated: Feb 11 2018 5:41PM



कोल्हापूर : प्रतिनिधी 

पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे हे शरद पवार यांच्या मामाचे गाव. कोल्हापूर दौऱ्यावर असताना पवार यांनी आज गोलिवडेला भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मिश्किल भाषेत तक्रार करताना ते म्हणाले की, 'पूर्वीपासून मामाची मुलगी करुन घेण्याची पध्दत आहे. माझ्याबाबत मात्र हे घडले नाही. कारण तुम्ही कधी सांगितले नाही आणि मीही कधी बघितली नाही, जाउदे आता पन्नास वर्ष झाली'. असे म्हणताच उपस्थितांत चांगलाच हश्या पिकला.

ते पुढे म्हणाले, घरातील स्त्री आत्मविश्‍वासाने उभी राहिल्यास तिच्या कतृत्वावर आदर्श भावी पिढीसह समाजाची निर्मिती होऊ शकते. यावेळी सदगुरु योगीप्रभुनाथ महाराज फौंडेशन गोलिवडे यांच्यातर्फे गावकर्‍यांच्या वतीने सत्काराचे अयाोजन करण्यात आले होते. भैरवानाथाचे पुजारी पांडुरंग गुरव, सरपंच सौ. नंदाताई चेचर यांच्या हस्ते पवार यांचा भारतीय संविधान, भैरवनाथाची मूर्ती, सन्मानपत्र, शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. गावातील नागरिकांनी गुढ्या उभारुन शरद पवारांचे स्वागत केले.

पन्हाळा तालुक्यातील गोळीवडे या मामाच्या गावी सत्कारासाठी आलेल्या खा. पवार यांनी आपल्या आईपासून मिळालेली संस्काराची शिदोरी, गावाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीतील नात्यांकडून संस्कार मिळाल्याने आपण सर्वोच्च पदापर्यंत पोहचल्याची स्पष्ट कबुली दिली. 

 

महिलांचा गौरव करताना खा.पवार म्हणाले, महिलेच्या नेतृत्वात कारभार नीट चालतो हा या गावाने आदर्श दाखविला आहे. हा आदर्श इतरांनी घेतल्यास ती गावेही दुरुस्त होतील. माझी आई 1936 साली पुणे लोकल बोर्डावर निवडून आली होती. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. मात्र काँग्रेसमधील काही वैचारिक मतभेदामुळे शेकापची स्थापना झाली. या घडामोडीत आई शेकाप सोबत राहिली. अडचणीतही ज्ञान संपादन करण्यासाठी पराकाष्ठा करुन नावलौकीक मिळविता येतो हे माझ्या आईने शिकविले. माझ्या आईच्या गावी येण्याची फार दिवसांची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली.