Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीने जेवणावळी देऊन ‘हल्‍लाबोल’ला गर्दी जमवली

राष्ट्रवादीने जेवणावळी देऊन ‘हल्‍लाबोल’ला गर्दी जमवली

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 12:16AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

ज्यांनी आजवर राज्याच्या तिजोरीवर डल्‍ला मारला, तेच आता हल्‍लाबोल आंदोलन करत आहेत. या ‘हल्‍लाबोल’साठी बकरी कापून, जेवणावळी घालून गर्दी केली जात आहे. नेसरीच्या शिवसेनेच्या सभेत आणि राष्ट्रवादीच्या हल्‍लाबोल सभेत मोठा फरक असून, पुढचा चंदगडचा आमदार शिवसेनेचाच असेल, असे माजी परिवहनमंत्री खा. गजानन कीर्तीकर यांनी  येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 

खा. कीर्तीकर म्हणाले, राज्यात शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यासाठी राज्यभर प्रमुखांचे दौरे सुरू आहेत. नेसरीमध्ये शिवसेनेने घेतलेला मेळावा व राष्ट्रवादीचा हल्‍लाबोल या दोन्हींमध्ये फारच अंतर आहे. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणार्‍यांना लवकरच त्याचे प्रायश्‍चित्तही मिळेल. राष्ट्रवादीचे सुरू असलेले हल्‍लाबोल आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.

लवकरच उमेदवार जाहीर

चंदगड विधानसभा उमेदवारीबाबत ते म्हणाले,  शिवसेना लवकरच आपला उमेदवार जाहीर करणार असून तिघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यानंतर दोघांनी शांत बसायचे व संघटनेचे काम करायचे. भाजपवाले तुमच्यापैकी एकाला नक्‍की कोटीची बॅग घेऊन त्यांच्यासोबत न्यायला येतील; मात्र तुम्ही संघटनेसोबतच राहायचे, असा दमही त्यांनी दिला.

उद्योग आणण्यासाठी प्रयत्न

शिवसेनेकडे उद्योग खाते असतानाही गडहिंग्लजच्या एमआयडीसीमध्ये एकही उद्योग आला नाही. याबाबत विचारणा करताच संघटनेचे कार्यकर्ते यामध्ये कमी पडल्याचे कबूल करत खा. कीर्तीकर यांनी आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून उद्योेग आणण्यासाठी प्रयत्न करू, असे म्हणाले. 

यावेळी शिवसेनेेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, प्रा. संजय मंडलिक, संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, दिलीप माने, संज्योती मळवीकर  उपस्थित होते.