होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील शिवसेना झीरो करणार : नारायण राणे

जिल्ह्यातील शिवसेना झीरो करणार : नारायण राणे

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 12:40AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत. पुढील निवडणुकीत ते झीरो करायचे आहेत; पण या आमदारांना पराभूत करायचे नाही, तर त्यांना दुसरीकडून निवडून आणायचे आहे. मागील तीन वर्षांपासून सत्तेत राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे नाक घासून घासून आता राहिलेले नाही. त्यांना राजकारणही कळत नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष  नारायण राणे यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

राणे म्हणाले, माझ्या पक्षाची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे. इथे केलेले कार्य श्री अंबाबाईच्या आशीर्वादाने यशस्वी होते, असे म्हणतात. ही राजर्षी शाहूंची पुरोगामी  नगरी आहे. महाराणी ताराराणींचा पराक्रमी वारसा येथे आहे. त्यामुळेच  नव्या पक्षाची सुरुवात या भूमीतूनच करत आहे. कोल्हापुरासह राज्यात सर्वच पक्षांतून आमच्या पक्षात लोक प्रवेशासाठी इच्छुक आहेत. मैत्रीच्या नात्यामुळे कोल्हापुरात   अनेक राजकीय नेते भेटले. 2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पक्ष लढवणार असून, पक्षाला किती जागांवर यश मिळेल, हे सहा महिने आधी सांगेन, असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणाची पूर्तता करणार
मी ज्या समित्यांचा अध्यक्ष होतो. त्या सगळ्या जबाबदार्‍या यशस्वी पार पाडल्या. मराठा समाजाला मी समितीचा अध्यक्ष म्हणून आरक्षण दिले. आता त्याची पूर्तता करणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नावर स्पष्ट केले. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मताचा मी आहे.  अल्पसंख्याकांना आरक्षण माझ्या काळात दिले असल्याची आठवण त्यांनी करून दिली. मी मुख्यमंत्री, मंत्री असताना वेगाने जनतेची कामे केली आहेत. लोकांना न्याय मिळवून देणारा आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून माझी प्रतिमा आहे. लोकांना असे नेतृत्व आवडते. त्यामुळेच माझ्या नव्या पक्षासोबत जनता राहील असा माझा विश्‍वास असल्याचे एक प्रश्‍नावर उत्तरादाखल त्यांनी सांगितले.

भाजपला बळकट करायचे असते तर मी त्या पक्षात गेलो असतो. मला कोणत्याही पक्षाने घेतले असते; पण मी वेगळा पक्ष काढला. माझा पक्ष भाजपसोबत म्हणजे एनडीएत आहे. तुमच्या मंत्रिपदाला विलंब का लागतो, असे विचारले असता तुम्हीच जरा याबाबत त्यांना सांगा, असे मिश्किल उत्तरही त्यांनी दिले. काँग्रेसवर आपण टीका करता. मग, नितेश राणे काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा का देत नाहीत, या प्रश्‍नावर राणे म्हणाले, माझी दोन्ही मुले माझ्यासोबत आहेत; पण काही तांत्रिक कारणांमुळे राजीनामा देता येत नाही. राजीनामा देऊन पुन्हा पोटनिवडणूक होण्यापेक्षा आता राहिलेली दोन वर्षे ते  जनतेची कामे करतील.

राणे म्हणाले, राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेबद्दल गुजरातच्या निवडणूक निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे नेते आहेत. काँग्रेस पक्षाबद्दल बोलेन; पण या नेत्यांबाबत बोलणार नाही. मी यापूर्वी कधी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतही  बोललो नाही. नाना पटोले अगोदरपासून भाजपवर नाराज होते. त्यांनी यापूर्वी थेट पंतप्रधानांवर टीका केली होती. त्यांचे राजकारण वेगळे आहे. त्यांचे पाय दुसरीकडे पडत होते. त्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असेल, असे एका प्रश्‍नावर त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूरच्या एमआयडीसीचे प्रश्‍न कधी सोडवले का?
उद्योजकांच्या प्रश्‍नांबाबत उद्धव ठाकरे हे मुंबईत मोर्चा काढणार असल्याच्या प्रश्‍नावर राणे म्हणाले,  त्यांना राज्य व केंद्राच्या कायद्याची माहिती नाही. शिवसेनेच्या आमदारांनी कधी कोल्हापूरच्या एमआयडीसीचे प्रश्‍न सोडवले ते दाखवा. भाजप आणि माझ्यात गिव्ह आणि टेकची भूमिका आहे. घ्यायचे असेल तर काही तरी द्यावे लागेल, असे त्यांनी भाजपबाबतच्या प्रश्‍नावर उत्तर दिले. वाढत्या वयावरून  नवा पक्ष काढण्याला विलंब झाला असे वाटते; पण आता योग्य वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत सोलापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, सिंधुदुर्गचे संदीप कुडतरकर, सम्राट महाडिक आदी उपस्थित होते.

शिवसेनेची पंचवीस मते घेतली असती
माझ्या विधान परिषदेच्या उमेदवारीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने जाहीर बैठका घेऊन मला विरोध केला. मी उमेदवार असतो तर काँग्रेस, राष्ट्रवादीची मते मोठ्या प्रमाणात फुटली असती, तर शिवसेनेचीही किमान पंचवीस मते घेतली असती. त्यामुळेच या निवडणुकीतून उद्धव ठाकरे पळाले, अशी टीका त्यांनी केली.