Sun, Jul 21, 2019 12:02होमपेज › Kolhapur › सामाजिक सलोखा बिघडवण्याचे मूठभर राजकारण्यांचे काम : पाटेकर

सामाजिक सलोखा बिघडवण्याचे मूठभर राजकारण्यांचे काम : पाटेकर

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 12:42AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मूठभर राजकारणी स्वत:ची राजकीय तुंबडी भरण्यासाठी तरुंणांचा वापर करत आहेत, त्यांची डोकी भडकवत आहेत, सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम या राजकारण्यांकडून सुरू आहे, असा आरोप करत अशा लोकांपासून सावध रहा, आपली ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्‍त केले. ‘आपला माणूस’ चित्रपटाच्या पार्श्‍वभूमीवर संवाद साधताना आपण काहीही झाले तरी राजकारणात जाणार नाही असे सांगत सिनेमालाच सेन्सारशीप असते, अन्य ठिकाणी नसते, काही चित्रपटांसाठी सामाजिक संदर्भ अपरिहार्यच असतात, पण चित्रपट निर्मितीवेळी काळजी घ्यायला पाहिजे, आपणच आपली सेन्सारशीप निर्माण केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पाटेकर म्हणाले, प्रक्षोभक भाषण करणार्‍यांची मुले येते शिकत नाहीत, ती परदेशात शिकतात, तिथेच चांगली नोकरी करतात. त्यांच्यावर कोणता गुन्हा नसतो. आपली मुले मात्र, भाषण ऐकतात मग कोण दगड हातात घेतो, कोण तलवार, मशाल हातात घेतो, जाळपोळ करतो. कारवाई झाल्यानंतर मात्र, आपल्याबरोबर कोणीही नसते हे समाजातील वास्तव आहे. याचा तरुणांनी गंभीर विचार केला पाहिजे. आपल्याकडील ऊर्जा वेगवेगळ्या कारणांसाठी काय वापरली जात नाही? हजारात नोकर्‍यात आणि कोटीत उमेदवार असे व्यस्त प्रमाण झाले आहे. 

याबाबत कोणी बोलत नाही, मात्र, जातीचे राजकारण करून आपल्या चुकांवर पाघंरून घालतात. त्यांचा बुरखा फाडायला पाहिजे.विरोधी पक्षात आल्यानंतरच चांगले का सुचते, सत्तेत असताना ते का सुचत नाही, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरे काम करत आहेत, तो तसा बराच माणूस आहे, राज्यातील तो ‘आपला माणूस’ आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण समाजात असल्याने राजकारणाचा भाग आहे, पण कधीही राजकारणात जाणार नाही, कोणाची मिरासदारी करण्यास आपल्याला आवडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुलेंवर चित्रपट करायचा असेल तर त्यावेळचे सामाजिक संदर्भ येणारच की, असे सांगत ते अपरिहार्यच असतात, पण आपणही मर्यादा पाळल्या पाहिजेत, निर्मितीवेळी आपणही सेन्सारशीप जपली पाहिजे, असे सांगत सेन्सारशीप फक्त चित्रपटाना असते, अन्य ठिकाणी ती नसते,असाही उपरोधिक टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही आठवणींना उजाळा दिला.