Wed, Apr 24, 2019 19:51होमपेज › Kolhapur › नमस्‍कार मंडळी : कोतवालच झालाय साहेब!

नमस्‍कार मंडळी : कोतवालच झालाय साहेब!

Published On: Jun 23 2018 9:11AM | Last Updated: Jun 23 2018 9:11AMघरातला गलका तरी थांबेल!

गेला महिना-दीड महिना शाळांना सुट्टी पडली तसा शाळेतला गलका प्रत्येक घराघरांत सुरू होता. घरकाम सांभाळत घरातील दोन-तीन मुलांना शांत करत त्यांना सांभाळणे आईबापांना नाकीनऊ आलं होतं. नवीन शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरू झाल्या. तसं सकाळी लवकरच बाचणी येथील एका आजोबाने सुनेला खड्या बोलानं सांगितलं, ‘ऐकलस का! ह्यास्नी नवी कापड घाल, तोंडास्नी पावडर लाव, घासभर पोटाला घाल आणि नऊ वाजता दे तानून शाळंला. मास्तर हाईत आणि ही पोर! घरातला गलका तरी तेवढा कमी झाला. शाळा शिकुद्यात नाहीतर नाही शिकुद्यात!

पंचायतीला सरकार पैसे देत नाही म्हणून...

अनेक चर्चा, वाद-विवाद, गुर्‍हाळे गार्‍हाणी गंगापूर-चिमगाव रस्त्याबद्दल चहाच्या टपरीवर सुरू होती. यामध्ये जो-तो लोकप्रतिनिधींच्या मर्जीतला म्हणाला  आमच्या साहेबांनी हा रस्ता या फंडातून धरलाय तवा हा रस्ता नक्की होणार म्हणजे होणार. यावर तिथेच बसलेला कमी शिकलेला मामा म्हणाला, ये बाबा बास कर, तुझं सांगणं. आमच्या पंचायतीला  सरकारकडनं पैसे मिळत नाहीत. म्हणून सांग. नाहीतर पैसे मिळाल्यावर आमची पंचायतच हा रस्ता डांबरी करून देईल. यावर बसलेल्या घोळक्यात हश्याचे फवारे उडाले. 

कोतवालच झालाय साहेब!

दहावी - बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. मग त्यासाठी आवश्यक असणारे दाखले आणि इतर कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसील कार्यालय आणि गावचावडीमध्ये पालकांची ये - जा चालू आहे. यामुळे तलाठी, अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा असणार्‍या कोतवालाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. रहिवासी, उत्पन्न, जातीचे इत्यादी दाखले कोतवाल तयार करतो व अंतिम सही तलाठी साहेब करतात. कागल तहसील कार्यालयामध्ये एका गावचा कोतवाल पालकांना बोलला, ‘साहेब कामात आहेत, वेळ लागेल, उद्या तयार करून मिळेल दाखला’ असं बोलताच वैतागलेला एक पालक त्राग्याने म्हणाला, ‘कोतवालच आता साहेब झालाय’ असं म्हणताच, हे खरं हाय, आमच्या मानातलं बोलला अस म्हणून सर्वांनी माना डोलावल्या. 

लाखोली अन्  दोन फुल्ल ग्लासची मागणी

राज्य मार्गावरील बार व देशी दारूचे दुकाने तब्बल एक वर्ष बंद होती. यामुळे राज्य शासनाचा महसूल तर बुडालाच. तळीरामांना आपला ब्रँड मिळविण्यासाठी दुप्पट पैसे मोजून पायपीट करावी लागत होती. त्यामुळे तळीरामांच्या रोजच्या रतीबात चांगलाच फरक पडला होता. यामुळे तळीरामांची कुटुंबीयही चांगलेच खुश होते. वर्षभर संसाराचे रहाटगाडगे ही झोकात चालले होते. शासनाने कायमचीच दारूबंदी करावी, अशी इच्छा तळीरामांच्या कुटुंबीयांची होती.

 मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा बीयर बार व देशी दारू दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे तळीरामांची पाऊले मद्याच्या दुकानाकडे वळू लागली आहेत.  दोन दिवसांपूर्वी अशीच एक व्यक्ती मद्याच्या दुकानाजवळ जाऊन शासनाने दारू दुकाने चालू का केली? असा प्रश्‍न करून लाखोली वाहत होता. हे ऐकून उपस्थित सर्वजण आवाक् झाले. थोड्यावेळाने याच तळीरामाने दुकानदाराकडे दोन फुल्ल ग्लास देण्याची मागणी केल्याने सर्वांच्यात एकच हश्या पिकला. 

... अन् उपसरपंच झालो!

  जांभळी खोर्‍यातील एका गावात सामाजिक कार्य करण्यासाठी बारा वर्षांपूर्वी  देशाच्या नावाने संघटना उदयास आली. या संघटनेचा एक कार्यकर्ता आपल्या व संघटनेच्या सामाजिक कार्यामुळे उपसरपंच झाला.  सामाजिक कार्य करताना राजकीय विघ्न ठरलेली असतात;  पण उपसरपंच झाल्यावर त्यात वाढ झाली. बारसे, जाऊळ, वाढदिवस, भांडण-तंटा यामध्ये बरासाचं वेळ जाऊ लागला. या ठिकाणी न गेल्यास ती व्यक्ती नाराज होण्याची भीती  होती. यामुळे सामाजिक कार्यासाठी वेळ मिळेना झाला. तसेच विरोधकांच्या राजकीय कुरघोडी बरोबरीने स्वकीयांकडून विघ्न येत असे, त्यामधून मार्ग व वेळ  काढत त्यांचे  सामाजिक कार्य चालू  आहे;  पण कधीकधी हा  जास्त त्रास होतो, तेव्हा अशा त्रासाला  वैतागून ते एके दिवशी म्हणाले, झक मारली अन् उपसरपंच झालो.