Thu, Apr 25, 2019 13:55होमपेज › Kolhapur › कळसकरच्या मित्रांचा शोध सुरू : ‘एटीएस’ कोल्हापुरात

कळसकरच्या मित्रांचा शोध सुरू : ‘एटीएस’ कोल्हापुरात

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्फोटकांसह 20 देशी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी जेरबंद संशयित शरद कळसकरची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी एटीएसचे विशेष पथक शनिवारी मध्यरात्री कोल्हापुरात दाखल झाले आहे. सीडीआरद्वारे कळसकरच्या कोल्हापूर येथील मुक्‍कामाच्या वास्तव्यासह मित्रांचाही शोध घेण्यात येत आहे. स्थानिक एसआयटीचे अधिकारी मुंबईतील एटीएसच्या संपर्कात असून, अधिकार्‍यांचे एक विशेष पथक मुंबईकडे रवाना होत आहे, असेही वरिष्ठ सूत्रांकडून समजते.

कळसकरचे मार्च-जून 2018 पर्यंत कोल्हापुरात वास्तव्य होते, अशीही माहिती पुढे आली आहे. येथील एका संस्थेत लेथ मशिन फिटरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कळसकर येथील काही खासगी कंपन्यांमध्ये चार वर्षांहून अधिक काळ नोकरी करीत होता, अशीही माहिती निष्पन्‍न झाल्याचे सूत्रांकडून समजते. या काळात कळसकर कोणाच्या संपर्कात होता? कोणत्या खासगी फर्ममध्ये त्याने नोकरी केली? त्याचे स्थानिक मित्र कोण होते? कळसकरसह त्याचे मित्र कोणत्या राजकीय पक्ष अथवा संघटनांशी संबंधित होते का, याचीही चौकशी सुरू असल्याचे समजते.

राजारामपुरी परिसरात त्याचे काही काळ वास्तव्य होते, अशीही माहिती पुढे येत आहे. मात्र, निश्‍चित ठावठिकाण्यासह माहिती मिळत नसल्याने एसआयटीच्या सूत्रांनी मुंबई येथील एटीएसच्यावरिष्ठाधिकार्‍यांशी संपर्क साधला आहे. मात्र, पथकाला ठोस माहिती उपलब्ध होत नसल्याने स्थानिक पथक मुंबईला रवाना करण्याचा विचार सुरू असल्याचेही समजते.

कळसकरच्या वापरातील मोबाईलद्वारे त्याचा सीडीआर प्राप्त करण्याचे वरिष्ठस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. सीडीआरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संशयिताची कोल्हापुरातील पाळेमुळे स्पष्ट होतील, असाही वरिष्ठाधिकार्‍यांचा सूर आहे.