Tue, Jun 25, 2019 15:08होमपेज › Kolhapur › एन.डी. यांनी सामान्यांच्या हिताची भूमिका मांडली : शरद पवार

एन.डी. यांनी सामान्यांच्या हिताची भूमिका मांडली : शरद पवार

Published On: Jan 13 2019 1:37AM | Last Updated: Jan 13 2019 1:34AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

शेतकरी, कामगारांसह उपेक्षित माणसांसाठी प्रा. एन. डी. पाटील हे आजही वयाच्या 92 व्या वर्षातही संघर्ष करत आहेत. शेती, सहकार, शिक्षणासह सर्वच क्षेत्रात त्यांनी उत्तुंग काम केले आहे. आयुष्यभर सामान्य माणसाच्या हिताची भूमिका मांडून, त्या पद्धतीची धोरणे राबवण्यासाठी त्यांनी सरकारला भाग पाडले. नव्या पिढीसाठी प्रा. पाटील यांचे जीवन आदर्शवत आहे, असे गौरवोद‍्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी शनिवारी काढले. 

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर. के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांना खा. पवार यांच्या हस्ते देण्यात आला. विद्यापीठाच्या लोककला केंद्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात खा. पवार बोलत होते. खा. पवार आणि प्रा. पाटील यांचे नाते मेहुणे-पाहुण्याचे असल्याने या पुरस्कार सोहळ्यातील भाषणांतून दोघांच्या नात्यांमधील कौटुंबिक जिव्हाळ्याचा पदर उलगडला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. सौ. सरोज (माई) पाटील, प्रा. बी. ए. खोत आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. 

आयुष्याभर संघर्ष

प्रा. एन. डी. पाटील यांच्या आठवणी सांगताना पवार म्हणाले, प्रा. पाटील यांनी जिद्दीतून स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा स्वभाव आणि धडाडीमुळे ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ते आवडते विद्यार्थी होते. सामान्य माणसाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी आयुष्यभर विधिमंडळात व रस्त्यावरही संघर्ष करण्याची भूमिका अखंड कायम ठेवली. स्वातंत्र्यानंतर शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन त्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांची विचारधारा डाव्या विचारांची आहे. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेले काम आजही त्याच तडफेने सुरू आहे. कोल्हापूरकरांनी त्यांना विधानसभेत काम करण्याची संधी दिली. 

शेतीबाबत प्रा. पाटील यांचे काम लक्षवेधी आहे, असे सांगत खा. पवार म्हणाले, त्यांनी  कापूस एकाधिकार योजनेची अंमलबजावणी केली. ऊस, ज्वारी, भात आदी पिकांच्या दराबाबतही त्यांनी काम केले. सध्याच्या बाजार समितीच्या यशस्वीतेचा पाया हा त्यांनीच रचला.

शिक्षण हा त्यांचा आवडीचा विषय होता. मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना तत्कालीन शिक्षण सचिव चित्रा नाईक होत्या. त्यावेळी  शिक्षणाचा आकृतिबंध नावाचे धोरण ठरवले; पण प्रा. पाटील यांनी गावागावांत जाऊन कडाडून विरोध करून, हा विषय हाणून पाडला. गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, संधी मिळावी, हा त्यांनी आग्रह धरला. या धोरणाला विरोध करताना त्यांनी या चित्राचा खरा नायक कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला होता तो चांगलाच गाजल्याची मिश्किल आठवणही त्यांनी सांगितली. 

एका राजकीय अपघाताची कहाणी

खा. पवारांनी राजकीय अपघाताचा उल्लेख करत सांगितले की, 1978 साली राज्याचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना काही धोरणांबद्दल आम्हा सहकार्‍यांमध्ये मतभेद होते. यातून पुलोद आघाडी आकाराला आली. यावेळी मी मुख्यमंत्री झालो. या मंत्रिमंडळात प्रा. पाटील हे सहकारमंत्री होते. त्यावेळी त्यांनी मंत्री म्हणून काम कसे करायचे, याचा आदर्श राज्याला दाखवून दिला.

शेतकर्‍यांची प्रकृती चांगली रहावी म्हणून...

आम्ही नेहमी प्रा. पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करतो. परवा माझ्या वाचनात आले की, त्यांनी या स्थितीतही शेतकर्‍यांच्या वीजदरवाढीविरोधात सखोल मांडणी केली. त्यांनी शेतकर्‍यांची प्रकृती चांगली रहावी म्हणून स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले आहे. रयत शिक्षण संस्थेसाठीही त्यांनी झोकून देऊन काम केले आहे, असे ते म्हणाले.  

वाढलेल्या वयाचा आनंदाने स्वीकार करा : एन. डी. 

प्रा. एन. डी. पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना शालेय जीवन जडणघडणीपासून ते रयत शिक्षण संस्थेमधील कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. पाटील म्हणाले, डॉ. कणबरकर यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हे माझे भाग्य आहे. डॉ. कणबरकर यांच्यासमवेत वडीलभाऊ या नात्याने संबंध राहिले. डॉ.कणबरकर यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यासंबंधीची कृतज्ञता स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी राजर्षी शाहू महाराजांवर पुस्तक लिहिले व त्यास मला प्रस्तावना देण्याचे भाग्य लाभले. 

रयत संस्था हा सुवर्णक्षण

वाढलेले वय खरे आहे, त्या वयाचा विचार करता आतापर्यंत निसर्गाने मला सर्व काही दिले. 92 वर्षांच्या वयात हात कापत असेल, तर दु:ख मानायचे काहीच कारण नाही. निसर्गाच्या नियमांना आनंदाने स्वीकारले पाहिजे. रयत शिक्षण संस्थेत जन्मलो, वाढलो. रयत शिक्षण संस्था नसती तर शिक्षणाविना राहावे लागले असते. बागणी गावचे शिक्षक परीट मास्तर यांच्यामुळे इंग्रजी शिक्षणाचा धागा रचला. त्यांचा कायमचा ऋणी आहे. रयत शिक्षण संस्था जीवनातील सुवर्णक्षण आहे. जीवनाचा ध्यास व श्‍वास आहे, अशी कृतज्ञतेची भावना डॉ. पाटील यांनी व्यक्‍त केली. 

विद्यापीठाचा सन्मान वाढला : कुलगुरू 

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कणबरकर पुरस्काराच्या निमित्ताने डॉ. एन. डी. पाटील यांच्यासारख्या  ज्येष्ठ, विचारवंत आणि कर्तृत्ववान व्यक्‍तीचा सत्कार करण्याचा योग आला. डॉ. एन. डी. पाटील यांच्या सत्कारामुळे शिवाजी विद्यापीठाचा सन्मान वाढला आहे. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय क्षेत्रातील दोन धुरंधर नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची संधी विद्यापीठास मिळाली. डॉ. पाटील यांनी समाजातील विविध घटकांसाठी केलेले काम, त्यांनी सर्वसामान्यांसाठी, समाजहितासाठी केलेल्या संघर्षाचा इतिहास पाहता विद्यापीठास मिळालेला त्यांचा सहवास म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. हा कार्यक्रम म्हणजे विद्यापीठाच्या आठवणीमध्ये दीर्घकाळ राहणारा सोहळा ठरणार आहे.

कणबरकर कुटुंबीयांतर्फेही एन. डी. यांचा गौरव

पुरस्कार वितरणानंतर डॉ. एन. डी. पाटील यांचा कणबरकर कुटुंबीयांतर्फेही गौरव करण्यात आला. डॉ. अरुण कणबरकर यांनी हा गौरव केला. या सोहळ्यास श्रीमती शालिनी कणबरकर, डॉ. अंजली साबळे, डॉ. नमिता खोत, डॉ. मेघा वाघळे आणि डॉ. बी. ए. खोत उपस्थित होते.

विचारांचा मधुघट रिता होणार नाही

‘यांचा दिवस कधी ढळणार नाही, विचारांचा मधुघट कधी रिता होणार नाही’, अशा काव्यमय शब्दांत शरद पवार यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या संपूर्ण कारकीर्दीचा गौरव केला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.