Fri, Nov 16, 2018 07:14होमपेज › Kolhapur › अखेरच्या क्षणापर्यंत मराठा समाजाच्या पाठीशी

अखेरच्या क्षणापर्यंत मराठा समाजाच्या पाठीशी

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 11:24PMकोल्हापूर : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा समस्त मुस्लिम समाजाचा पाठिंबा असून, शेवटच्या क्षणापर्यंत मराठा समाजाच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार मुस्लिम समाजाच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर होते.

 मुस्लिम बोर्डिंग येथे शुक्रवारी आयोजित बैठकीला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुधवारी (दि. 1 ऑगस्टला) दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत ठिय्या आंदोलन करण्यात येणार 
आहे.  
मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास म्हणाले, मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन तो पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी आपली आहे. मराठा समाजाला नोकर्‍यांमध्ये आरक्षण नाही, तरुणांना शिक्षणामध्ये सवलती नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाला ताकदीने साथ दिली पाहिजे. सर्व मुस्लिम बांधवांनी हातात हात घालून या लढ्याला ताकद देण्यासाठी एकत्र यावे. 

चेअरमन आजरेकर म्हणाले, मराठा समाज आपला थोरला भाऊ आहे. त्याच्या मदतीला धावून जाणे हे धाकट्या भावाचे कर्तव्य आहे. मराठा आरक्षणाला संघटितपणे पाठिंबा देऊया. आरक्षण मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहूया. त्यांच्या लढ्याला साथ देऊया. 

प्रशासक कादर मलबारी म्हणाले, आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत साथ देऊया. 

बैठकीला फिरोजखान उस्ताद, अस्लम मोमीन, महंमदशरीफ शेख, अजीज जमादार, आसिफ कुरेशी, पापाभाई बागवान, अल्ताफ झांजी, रफिक मुल्ला, मुन्नाफ देसाई, अल्लानूर बागवान, मुबारक बागवान, गौसखान पठाण, शौकत बागवान यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित 
होते.