रिक्षाचालकाच्या खुनाचा अवघ्या सहा तासांत उलगडा

Last Updated: Jun 06 2020 1:15AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

पत्नीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून शेजार्‍यानेच रिक्षाचालक लक्ष्मण भागवत डावारे (वय 33, रा. साळोखे पार्क, भारतनगर) याचा खून केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. खून केल्यानंतर ही आत्महत्या असल्याचे भासविण्याचा प्रयत्न संशयित आरोपींनी केला होता. पोलिसांनी सहा तासांत याचा उलगडा करत चार संशयितांना अटक केली. 

मुख्य संशयित किशोर भगवान आयरे (वय 30) याच्यासह करण नंदकुमार कंगले (21), अमोल दिलीप खर्जे (26), समाधान बळी कांबळे (27, सर्व रा. साळोखे पार्क, भारतनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लक्ष्मण डावारे याचा बुधवारी रात्री गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह संभाजीनगर परिसरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिीम परिसरातील नाल्यात फेकण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली.

किशोर आयरे याचे साळोखे पार्क परिसरात किराणा मालाचेे दुकान आहे. या दुकानाशेजारीच लक्ष्मण डावारे पत्नी व तीन मुलींसोबत राहत होता, तर डावारेचे आई, वडील राजेंद्रनगरात राहण्यास आहेत. काही महिन्यांपासून लक्ष्मण डावारे हा किशोरच्या पत्नीला वारंवार त्रास देत होता. दारूच्या नशेत आयरे याच्या दुकानासमोर जाऊन सर्वांना शिवीगाळ करीत होता. 

डावारेसोबत झालेल्या भांडणानंतर आयरे याच्या डोक्यात राग होता. त्यामुळे डावारे याच्या खोलीत जाऊन गळा आवळून त्याला संपवले. यानंतर एका रिक्षातून त्याचा मृतदेह हॉकी स्टेडियम येथील पुलावरून नाल्यात फेकून दिला.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न डावारे याचा मृतदेह गुरुवारी दुपारी पोलिसांना मिळून आला. यावेळी किशोर आयरे हा घटनास्थळाजवळच होता. काही मित्रांशी बोलताना, ‘पत्नीचा गर्भपात झाला म्हणून त्याने आत्महत्या कशाला करायची’ असे पोलिसांसमोर तो वारंवार बोलत होता. डावारे याच्या अंत्यविधीमध्येही आयरेचा पुढाकार असल्याने पोलिसांना सुरुवातीला त्याच्यावर संशय आला नव्हता. मात्र, यातून त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

संशयित करण कंगले हा बुधवारी रात्री डावारेच्या घराजवळ गेला होता, अशी माहिती समोर आली. तसेच आयरे याच्या दुकानातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांना त्याच्यावरही संशय आला. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशीला आणले असता दोघांनीही खुनाची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले. 

सामाजिक कार्यात पुढाकार

संशयित किशोर आयरे हा एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून कार्यरत होता. महापूर तसेच कोरोनाच्या संकटात त्याने गरजूंना साहित्य वाटपात पुढाकार घेतला होता.