Wed, Jun 26, 2019 18:23होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत गुंडाचा भीषण खून

इचलकरंजीत गुंडाचा भीषण खून

Published On: Jul 24 2018 1:32AM | Last Updated: Jul 24 2018 1:32AMइचलकरंजी : वार्ताहर

गुन्हेगारी टोळीमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने जयभीमनगर येथील रामा कचरू गरड (वय 30) या गुंडाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून धारदार शस्त्रांनी जबर वार करून निर्घृण खून करण्यात आला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास शांतीनगरमधील कंजारभाट वसाहत परिसरात हा प्रकार घडला. खुनानंतर अवघ्या तीन तासांतच गावभाग पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका अल्पवयीन सराईत गुन्हेगारासह सात हल्लेखोरांना जेरबंद केले. खुनाच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

संतोष ऊर्फ ऋषा बाळू बाबर (वय 20, रा. आभारफाटा), असिफ महम्मद शेख (20, रा. दत्तनगर), राजेश ऊर्फ लाज्या नामदेव चव्हाण (24, रा. दत्तनगर), किरण ऊर्फ किया आप्पासो वडर (20, रा. जयभीमनगर), सोहेल सिराज शेख (21, रा. कोरोची) व अक्षय बबन कल्ले (20, रा. तारदाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

जयभीमनगरमध्ये राहणारा रामा गरड हा सेंट्रिंग काम करतो. गेल्या काही वर्षांपासून तो पुणे येथे वास्तव्यास होता. सहा महिन्यांपूर्वी तो पुन्हा इचलकरंजीत आला होता. सोमवारी दुपारी नातेवाईकांच्या गाडीचा हप्‍ता भरण्यासाठी मोटारसायकलवरून तो बाहेर पडला. थोरात चौक परिसरात तो आला असता, त्याला हल्लेखोरांनी गाठले. हल्लेखोरांनी आपला पाठलाग सुरू केल्याचे लक्षात येताच शांतीनगर ते रिंगरोडकडे जाणार्‍या रस्त्यावर मोटारसायकल टाकून रामाने अक्षरश: पळ काढला. सहा ते सात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रासह त्याचा पाठलाग केला. शांतीनगर परिसरात कंजारभाट वसाहत येथे असणार्‍या एका चौकात पाय घसरल्याने तो थांबलेल्या ट्रकसमोर आदळला. हल्लेखोरांनी तिथेच त्याला गाठले आणि धारदार शस्त्रांनी अवघ्या काही सेकंदातच रामावर सुमारे दहा ते बारा वार केले. डोक्यात, चेहर्‍यावर, हातावर, मनगटावर 15 हून अधिक वर्मी घाव बसल्याने रामा जागीच गतप्राण झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. काही वेळातच त्याची ओळख पटली. इंदिरा गांधी इस्पितळात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. 

रामा याच्यावरही यापूर्वी मारामारीसह तीन गुन्हे दाखल आहेत. शहरातील गुंड बबलू जावीर व त्याच्या साथीदारांना 2015 मध्ये पन्हाळा येथील न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता, त्यांना पळून जाण्यास मदत करणार्‍यांमध्ये रामा याचाही समावेश होता. याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनाच्या घटनेनंतर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, इचलकरंजीचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. खुनाच्या घटनेनंतर गावभागचे निरीक्षक प्रदीप काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी व त्यांच्या पथकाने तीन तासांतच संशयित हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या.

लक्ष्मी इंडस्ट्रियल परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये एका अल्पवयीन सराईत गुन्हेगाराचाही समावेश आहे. ही कारवाई महेश कोरे, वैभव दड्डीकर, रणजित पाटील, विजय तळसकर, राजू पट्टणकुडे, रवी कोळी, संतोष पाटील, सुरेश गुरव, फिरोज बेग, संदीप मळघणे यांनी केली आहे. दरम्यान, या संशयितांवरही ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही अप्पर पोलिस अधीक्षक घाडगे यांनी यावेळी दिली.