Sun, Aug 18, 2019 21:34होमपेज › Kolhapur › मोरेवाडी खुनातील मारेकरी मोकाटच

मोरेवाडी खुनातील मारेकरी मोकाटच

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 10 2018 11:13PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मोरेवाडी (ता. करवीर) येथील अनोळखी व्यक्तीच्या खूनप्रकरणी करवीर पोलिसांच्या हाती अजूनही ठोस धागेदोरे लागले नाहीत. खुनाची घटना उघड होऊन आठवड्याचा कालावधी झाला. मारेकरी मोकाट राहिल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, अनोळखीचा गळा आवळून खून झाल्याचे उत्तरीय तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे.

मृतदेहाचा छडा लावण्यासाठी करवीर व एलसीबी पथकांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यासह कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, रायबाग, निपाणी, संकेश्‍वरात शोध घेण्यात आला. ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत. मृत व्यक्ती बिहार अथवा राजस्थानातील असावी, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

मोरेवाडी स्मशानभूमीलगत शिवाजी मोरे यांच्या शेतातील पडक्या विहिरीत पंचेचाळीस वर्षीय अनोळखीचा खून करून मृतदेह सिमेंटच्या पोलला बांधून फेकून देण्यात आल्याचा प्रकार दि. 1 फेब्रुवारीला उघडकीला आला होता. निर्जन माळरानावर ही घटना घडल्याने मोरेवाडी, पाचगाव पंचक्रोशीत खळबळ उडाली होती.  

मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान

मारेकर्‍यांच्या अमानुष कृत्यामुळे अनैतिक संबंधातूनच ही घटना घडली असावी, असा तपासाधिकार्‍यांचा संशय आहे. मारेकरीच काय; पण मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप यश न आल्याने तपास यंत्रणा थंडविल्याचे दिसून येते.

वाड्यावस्त्यांवरही दवंडी!

तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक दिलीप जाधव म्हणाले की, पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटकात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात आला. मृतदेहाच्या छायाचित्रासह पाचशेवर पत्रके वितरित करण्यात आली आहेत. वाड्यावस्त्यांवर दवंडीही देण्यात आली. मात्र, सुगावा लागला नाही.

अनोळखीचा अन्यत्र गळा आवळून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोरेवाडी परिसरात निर्जन पडक्या विहिरीत फेकून देण्याचा प्रयत्न झाला आहे. विविध तपास पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे. मात्र, मृतदेहाची ओळख पटवून मारेकर्‍याचा निश्‍चितपणे छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यास यश येईल, असाही त्यांनी दावा केला.