Fri, Apr 26, 2019 15:36होमपेज › Kolhapur › पाचगावात तणावपूर्ण शांतता

पाचगावात तणावपूर्ण शांतता

Published On: Apr 23 2018 4:40PM | Last Updated: Apr 23 2018 5:32PMकोल्हापूर : प्रतिनिधी

माजी सरपंच अशोक पाटील व प्रतिस्पर्धी गटाचा प्रमुख दिलीप जाधव ऊर्फ ‘डीजे’चा मेव्हणा धनाजी गाडगीळ खून खटला निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पाचगाव (ता. करवीर) येथे सोमवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. मारेकर्‍याना आजन्म जन्मठेप शिक्षा ठोठावल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्यात आली होती. जमावबंदी आदेशही पुकारण्यात आला होता.

राजकीय वर्चस्ववादातून अशोक पाटील व दिलीप जाधव यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. त्यातून दिलीप जाधव याने साथीदाराच्या मदतीने अशोक पाटील याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून काटा काढला, तर खुनाचा बदला खुनाने या सूडचक्रातून अशोक पाटील याच्या दोन्ही मुलांसह पाचजणांनी धनाजी गाडगीळवर पाचगाव येथील चौकात हल्ला करून त्याचा खून केला होता.

खुनाच्या घटनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दोन्ही खुनाच्या निकालाकडे जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. न्यायालयाने दुपारी पावणेबारा वाजता गाडगीळ खुनातील पाच, अशोक पाटील खुनातील सहा मारेकर्‍यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची बातमी पसरताच पाचगावमध्ये कमालीची शांतता निर्माण झाली. रस्ते, चौक निमर्नुष्य बनले होते. काही काळ व्यवहारही बंद ठेवण्यात आले होते.

दोनही घटनांतील मारेकर्‍यांना जन्मठेप झाल्याने गावात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, तानाजी सावंत, शहाजी निकम यांच्यासह पन्नासहून पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला. अशोक पाटील व गाडगीळ यांच्या घरासमोर बंदोबस्त ठेवण्यात आला. व्यापार्‍यांना दैनंदिनी व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार काही वेळात सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत गावात पोलिस बंदोबस्त कायम होता. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता, असेही पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले.

Tags : Murder, Crime, case, pachgov