मुरगूड : प्रतिनिधी
देशपातळीवरील अटल मॅरेथॉन 2017 स्पर्धेसाठी देशातून दहा हजार शाळांच्या सहभागी उपकरणांमधून 100 शाळा दिल्ली येथे प्रकल्प सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या होत्या. तेथे नुकत्याच 100 शाळांमधून ‘टॉप थर्टी ’ शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजने सादर केलेल्या ‘सांडपाण्यापासून ऊर्जा निर्मिती’ प्रकल्पाची ‘पाणी व्यवस्थापन’ विभागात देशात तिसर्या क्रमांकाने निवड झाली आहे. त्यामुळे शिवराजच्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा खोवला गेला
आहे.
नीती आयोगाद्वारे या वर्षीपासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन वाढावा म्हणून देशपातळीवर अटल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत ऑनलाईन माहिती व व्हिडीओ सादर करायचा होता. ही स्पर्धा सहा विभागांत घेण्यात आली होती. यामध्ये स्वच्छ भारत, क्लीन एनर्जी, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, वैद्यकीय, कृषी विज्ञान अशा विभागात स्पर्धा घेण्यात आली. शिवराजने ‘पाणी व्यवस्थापन’ प्रकारात ‘सांडपाण्यापासून ऊर्जा निर्मिती’ आपला प्रकल्प सादर केला होता.
त्याचा अंतिम निकाल जानेवारीत एटीएलचे प्रमुख डॉ. रामानंद यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जाहीर केला. यामधून देशभरातून 100 शाळा दिल्ली येथे होणार्या प्रकल्प सादरीकरणासाठी निवडण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्रातून सहा शाळांची निवड झाली असून त्यामध्ये शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा समावेश झाला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील निगडी येथील शाळा व कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूडच्या शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजची निवड झाली आहे. या प्रकल्प तयारीसाठी प्राचार्य महादेव कानकेकर, लॅबचे इनचार्ज प्रा. उदय शेटे, उपकरण मार्गदर्शक प्रा. पी. पी. पाटील, प्रा. टी. एस. मेटकरी तसेच प्रथमेश शेटे, कुमारी अनुजा पाटील, मयुरी कोळी, मुबिना शिकलगार या विद्यार्थ्यांनी उपकरण बनविले आहे.