Fri, Apr 26, 2019 03:39होमपेज › Kolhapur › मनपाच्या आरक्षित जागांना धक्‍का नाही : आ. मुश्रीफ

मनपाच्या आरक्षित जागांना धक्‍का नाही : आ. मुश्रीफ

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्‍तांकडे गेल्या 20 वर्षांच्या कारभाराची जी माहिती मागितली आहे, त्याची सविस्तर माहिती द्यावी, अशी सूचना महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांना करण्यात आली आहे. गेल्या वीस वर्षांत महापालिकेच्या आरक्षित जागांना धक्‍काही लावण्यात आलेला नाही, असे राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

पालकमंत्री पाटील यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार बैठक घेऊन महापालिकेच्या हद्दीतील जुन्या पुणे-बंगळूर रोडवरील शेतकरी संघाची जागा, रमणमळ्यातील वॉटर पार्क यासह गेल्या वीस वर्षांत महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागेवरील आरक्षण उठवून त्या ठिकाणी टोलेजंग इमारती बांधल्या आहेत, त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

आ. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील इतर महापालिकांमध्ये त्यांच्या ताब्यातील जागांचे आरक्षण उठविण्याचे अनेक प्रकार घडले आहेत; पण कोल्हापूर महापालिकेत गेल्या 20 वर्षांत जागेवरील आरक्षण उठविण्यासंदर्भात एकही ठराव  केलेला नाही. जुन्या पुणे-बंगळूर रोडवरील शेतकरी संघाच्या जागेबाबत पालकमंत्री बोलले आहेत; पण संघाची जागा ही सिक्युरिटी अ‍ॅक्टखाली जिल्हा बँकेच्या ताब्यात होती. शेतकरी संघाने जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज थकले होते, त्यामुळे बँकेने संघाची ती जागा विक्रीस काढली. त्या जागेवर यूएलसीचा ताबा होता. बँकेने त्यासाठी प्रयत्न करून यूएलसीच्या ताब्यातून ती जागा काढून घेतली. तसेच अकृषक कराची रक्‍कम बँकेने भरली, अशाप्रकार सर्व शासकीय परवाने घेऊनच ती जागा विक्रीस काढली. 

त्यानंतर त्या जागेबाबत बँकेतर्फे वृत्तपत्रांतून जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार पुण्यातील भाजपचे खा. संजय काकडे यांनी ही जागा खरेदी केली. त्यानंतर खा. काकडे यांच्याकडून संजय डी. पाटील यांच्या कंपनीने ही जागा खरेदी केली आहे. संघाच्या जागेवर कोणतेही आरक्षण नव्हते, तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना त्या दिवशी का राग आला हेच कळत नाही, असा टोलाही आ. मुश्रीफ यांनी लगावला. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, municipal reserved seats,