Mon, Feb 18, 2019 01:22होमपेज › Kolhapur › मुद्रा बँक योजनेचा शुक्रवारी महामेळावा

मुद्रा बँक योजनेचा शुक्रवारी महामेळावा

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:08AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

मुद्रा बँक योजनेंतर्गत जिल्ह्यातील तरुणांना विविध व्यवसाय-उद्योगांसाठी कर्ज प्रकरणे एका छताखालीच दाखल करता यावीत, या उद्देशाने शिवाजी स्टेडियमवर शुक्रवारी (दि. 19) मुद्रा बँक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

काटकर म्हणाले, दि. 19 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा महामेळावा होणार आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील बँकांचे सुमारे 40 ते 50 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या स्टॉल्सवर मेळाव्यास येणार्‍या तरुण-तरुणींना मुद्रा बँक योजनेची सविस्तर माहिती देण्याबरोबरच कर्ज प्रकरणांची प्रक्रिया सांगण्यात येणार आहे. तसेच यावेळी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह तरुणांकडून दाखल करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  महामेळाव्याच्या ठिकाणी भव्य सभामंडप उभारण्यात येणार असून यामध्ये 35 स्टॉल्स बँकांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी पार्किंग तसेच खाद्यपेयांसाठी बचतगटांचे 5 स्टॉल्स राखून ठेवण्यात आले आहेत. यावेळी कोणत्याही बँकेच्या स्टॉलवर कोणत्याही बँकेचे कर्जमागणी अर्ज उमेदवारांना सादर करता येणार आहेत.

मेळाव्यात सायंकाळी 3 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही काटकर यांनी केले. मेळाव्यात मुद्रा बँक योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या बँकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात येणार असून या योजनेस कमी कामगिरी करणार्‍यां बँकांची नावे जाहीर करून त्यांना यापुढे अधिक काम करण्याची सूचना केली जाणार आहे. तसेच या योजनेबाबत सूचना, तक्रारी असतील तर त्याही स्वीकारल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, माहिती उपसंचालक सतीश लळीत, पोलिस उपाधीक्षक सतीश माने, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी राहुल माने, रवींद्र बार्शीकर, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सहायक संचालक एस. आर. माने यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.