Thu, Jun 27, 2019 02:22होमपेज › Kolhapur › आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

Published On: Aug 05 2018 1:29AM | Last Updated: Aug 05 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहूंच्या नगरीत सुरू असणारे मराठा आरक्षण ठिय्या आंदोलन गेली अकरा दिवस लोकशाही मार्गाने सुरू आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असे सांगून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. आंदोलनात आपण स्वत: एक मराठा म्हणून आंदोलनकर्त्यांसोबत ठामपणे राहू, अशी ग्वाही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. दसरा चौकात सुरू असणार्‍या सकल मराठा क्रांती ठोक ठिय्या आंदोलनास त्यांनी शनिवारी सहभाग घेतला. 

पाटील म्हणाले, इतर कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता 16 टक्के आरक्षण मिळावे अशी मराठा समाजाची मागणी आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात या संदर्भातील अध्यादेश काढला होता. 2014 ला  मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री मंडळाने घेतला होता. या आरक्षणामुळे तरुणांना शैक्षणिक सवलती, नोकर्‍याही लागल्या.  महाराष्ट्रातील 35 टक्के मराठा समाज शेतमजूर म्हणून काम करतोय, मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करतोय, मोल मजुरी करणार्‍या मराठ्यांची संख्या लाखात आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना श्रीमंत वर्ग बाजूला काढला. 

आंदोलनस्थळी अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, प्रा. मधुकर पाटील, जयकुमार शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आर. डी. पाटील, एस. व्ही. सूर्यवंशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महावीर गाट आदींसह आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सरकारने खुलासा करावा
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात आरक्षणाच्या निर्णयावर तिरोडकर नावाच्या व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप  सरकारने उच्च न्यायालयाला आपण सत्तेवर आलो आहोत. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय करू नये असे पत्र देणे अपेक्षीत होते, असे सांगून  खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते तर मग त्यांनी तसे पत्र का दिले नाही याचा जाहीर खुलासा सरकारने जनतेसमोर करावा, अशी मागणी पाटील यांनी केली. 

आरक्षण मिळू नये अशी व्यूहरचना
सरकारच्या अशा कारभारामुळे 29 नोव्हेंबरला आरक्षणाला स्थगिती मिळाली. यानंतर अलीकडे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण आम्हीच केले असल्याबद्दल दिशाभूल केली. जून 2014 ला काँग्रेस-राष्ट्रवादीने काढलेल्या अध्यादेशाचा एक शब्दही न बदलता सत्ताधार्‍यांनी नागपूर अधिवेशनात त्याचा कायदा केला. वास्तविक मराठ्यांना आरक्षण मिळू नये, अशी व्यूहरचना सत्ताधार्‍यांची आहे, असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. 

सामाजिक तणावाची चार वर्षे
मराठा समाजाने आजपर्यंत कोणत्याही जाती-धर्माच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही. या उलट समाजातील विविध जाती-धर्मियांना आरक्षण मिळावे आणि त्यांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यामुळेच आज मराठा समाजाच्या  आंदोलनाला इतर सर्व जाती-धर्मियांचा पाठिंबा मिळत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. देशात सर्वाधिक तणाव गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रात विद्यमान सरकारमुळे निर्माण झाल्याचा आरोप करून मराठा समाजासह मुस्लिम, धनगर, लिंगायत, महादेव कोळी अशा अनेक समाजांचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. सर्व समाजांना रस्त्यावर आणण्याचे काम सत्ताधार्‍यांनी केल्याची टीका पाटील यांनी केली. 

कोल्हापूरकरांचे कौतुक...
आंदोलन कसे  करावे, लोकशाही पद्धतीने आपल्या न्याय मागण्या व भूमिका कशी मांडावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर आहे. आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीला न जाण्याचा निर्णय इथल्या आंदोलनकर्त्यांनी आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक हर्षवर्धन पाटील यांनी केले.  शाहूनगरी कोल्हापुरातील सर्व जाती-धर्मातील लोक एकोप्याने राहतात. यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सर्व जाती-धर्मियांचा पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम धर्मिय बांधवांनी तर आंदोलन सुरू झाल्यापासून मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलकांना भक्कम पाठबळ आणि सर्व प्रकारचे सहकार्य दिल्याबद्दल  पाटील यांनी त्यांचे आवर्जुन कौतुक केले. प्रशासनात 20 वर्षे आणि कोल्हापूरचा  पालकमंत्री म्हणून दहा वर्षे काम पाहिले आहे. मात्र, कधीही आपण कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. कोणावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.