Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Kolhapur › धनगर समाजातर्फे धरणे आंदोलन 

धनगर समाजातर्फे धरणे आंदोलन 

Published On: Aug 14 2018 1:10AM | Last Updated: Aug 14 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असूनही शासनाच्या नाकर्तेपणामुळे ते आरक्षण मिळत नाही. याच्या निषेधार्थ पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून समस्त धनगर समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचा ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करत शासनाचा निधेष केला. तसेच धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे, त्याची तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा समाजाचे नेते बबनराव रानगे यांनी बोलताना दिला. 

सकाळी अकरा वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. रानगे म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू आहे. पण धनगर आणि धनगड या शब्दप्रयोगामुळे राज्य शासनाने या समाजाचा एन.टी.मध्ये तर केंद्रात ओ.बी.सी प्रवर्गामध्ये समावेश केला आहे. यामुळे धनगर समाजाला खर्‍या आरक्षणाचा लाभच मिळत नाही. यामुळे समाज आता संतप्‍त होऊन रस्त्यावर उतरला आहे. 

भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली बारामती येथे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण सोडा, सत्तेवर येताच धनगर समाजाला एस.टी.चे आरक्षण लागू करू, असे आश्‍वासन दिले होते; पण चार वर्षे उलटली तरीही भाजप सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही, सतत चालढकल करत आहे. याच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी चौंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित करून तेथे पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 

या आंदोलनात राघू हजारे, शहाजी सिद्द, बयाजी शेळके, सुवर्णा अपराज, प्रल्हाद पाटील, श्रेया हजारे, राजेश बाणदार, विकास घागरे, प्रल्हाद देबाजे, रामाप्पा करीगार, सिद्धार्थ बन्‍ने, बाबुराव बोडके, विठ्ठल भमानगोळ, बापूसाहेब ठोंबरे, आप्पासो बंडगर, अमित खोत यांच्यासह मोठ्या महिला सहभागी झाल्या होत्या.