होमपेज › Kolhapur › आईचं पत्र हरवलं!

आईचं पत्र हरवलं!

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 04 2018 11:04PMकोल्हापूर : विजय पाटील

स.न.वि.वि. दादा, आम्ही पुढच्या सोमवारी येतोय... आबांना आणि आईला नमस्कार... चिमूला गोड पापा आणि अनेक आशीर्वाद...अशा आशयाचा पोस्ट कार्डवरील मजकूर मे महिन्याच्या सुट्टीत घरोघरी पोस्टमन घेऊन यायचा. पत्र आलेले पाहून आत्याबाई येणार... पिंट्या येणार आता मज्जाच मज्जा, असं म्हणत घरातली मंडळी एकच कल्ला करत सुटायची. मे महिन्याची सुट्टी आली की, माहेरी भावाच्या नावानं पत्र पाठवून ख्यालीखुशाली विचारत येण्याची आगाऊ सूचना देणारी पत्राची पद्धत आता इतिहासजमा झाली आहे. 

आईचं पत्र हरवलं... ते मला सापडलं, असं शाळेत खेळ खेळत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. महिलांना माहेर आणि लहानग्यांसाठी मामाचा गाव हा अत्यंत जिव्हाळ्याचा धागा आहे. नव्या जगातही हा धागा तितकाच घट्ट असला, तरी पत्रासारख्या हळुवार गोष्टी मात्र हरवल्या आहेत. पत्र हे माणसांशी नाते दृढ करणारे प्रभावी माध्यम काही वर्षांपूर्वीपर्यंत होतं; पण आता तंत्रज्ञानाने पत्र अणि माणसं याचा संबंध जवळपास संपुष्टात आणण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. 

प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल असल्याने एक कॉल करून आम्ही येतोय, असा निरोप दिला की विषय संपतोय; पण पूर्वी पत्र हेच मामाच्या गावाला जाण्यासाठी आगाऊ सूचना देण्याचे माध्यम होतं. या पत्रात संबंधित बहिणाबाईसुद्धा जीव ओतून शब्दांतून भावना व्यक्त करायच्या. आई-वडील, भाऊ, वहिनी अशा सर्वच नात्यांबद्दलचा काळीजनूर दाखवणारा मजकूर या पत्रात असायचा. त्यामुळे ही पत्रे वर्षानुवर्षे संग्रही ठेवण्याची पद्धत असे. मामाचा गावात जाऊन विहिरीत पोहायचे, शेतात हुंदडायचे आणि झाडांवरील मनसोक्त आंबे खायचे, असे नाना बेत बच्चे कंपनीचे असायचे. अगदी महिनाभर अघळपघळ सुट्टीचे नियोजन हे ठरलेले असे; पण आता सगळंच बदललं.