Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील सावकारीचा पाश सुटेना 

जिल्ह्यातील सावकारीचा पाश सुटेना 

Published On: Jul 14 2018 12:21AM | Last Updated: Jul 13 2018 11:52PMकोल्हापूर : गौरव डोंगरे 

दरडोई उत्पन्न सर्वाधिक असणार्‍या सधन कोल्हापूर जिल्ह्यात सावकारी पाश आणखीन घट्ट होताना दिसत आहे. शेतकरी, नोकरदार, छोटे उद्योजक, मजूर अशा सर्वांना या पाशात लपेटणारे सावकार मात्र दिवसेंदिवस गब्बर होत चालले आहेत. जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड येथील सावकारीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अशा सावकारांविरोधात शोषितांनी तक्रार दाखल करण्याचे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे. 

खासगी नोकरी, मजुरांची कर्ज फेडण्याची क्षमता नसल्यास बँका, पतसंस्था कर्ज देऊ शकत नाहीत. आजारपण, लग्न, घरगुती समारंभावेळी हातउसने पैसे घेण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. सहज मिळणार्‍या पैशामुळे अनेकदा हतबल होऊन सावकाराच्या दहा टक्क्यांपासून पंचवीस टक्क्यांपर्यंत व्याजाच्या अटीला अनेकांचा होकार मिळतो. याचा गैरफायदा घेत वाहने, घर, शेतजमिनी नावावर लिहून घेण्याचे प्रकार सावकारांकडून केले जातात. 

जादा व्याजाने हैराण...

कसबा बावडा, लाईन बाजार येथील एका रिक्षा चालकानेही व्यवसायासाठी कसबा बावड्यातील तीन सावकारांकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्याने व्याजासह 1 लाख 40 हजार रुपये चुकते केले. यानंतरही पैशाची जुळणा होत नसल्याने या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षातच विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

पठाणी व्याजाची वसुली 

मुद्दलीच्या दुप्पट व्याज वसूल करणारी सावकारीची पाळेमुळे खोलवर आहेत. लग्न, बारसे, वाहन खरेदी, दवाखाना खर्च अशावेळी या सावकारांकडून रक्कम दिली जाते. पण, त्याबदल्यात पठाणी व्याज वसूल केले जाते. पैसे घेणार्‍याकडून पैसे वसूल करणारी यंत्रणाही या सावकारांकडे आहे. अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार या सावकाराच्या आडाने आपले अवैध व्यवसाय चालवितात. त्यांच्या कर्जाची वसुली करून देऊन आपला चरितार्थ चालवित आहेत. 

संस्थान काळातही सावकारीचा धंदा

संस्थान काळातही सावकारीचा धंदा तेजीत होता. यात सर्वसामान्य जनता भरडली जात होती. अव्वाच्या सव्वा व्याज वसुलीला तेव्हाही पठाणी व्याज असे बोलले जात होते. राजर्षी शाहू महाराजांनीच यातून जनतेला बाहेर काढण्यासाठी 1902 साली बँकांच्या स्थापनेला प्रोत्साहन दिले. त्यांच्याच प्रयत्नातून पुढे कोल्हापूर अर्बन बँकेची स्थापना झाली.