Sun, Jan 19, 2020 16:21होमपेज › Kolhapur › हलकर्णीत विद्यार्थिनीचा विनयभंग

हलकर्णीत विद्यार्थिनीचा विनयभंग

Published On: Jul 24 2019 1:56AM | Last Updated: Jul 24 2019 1:48AM
गडहिंग्लज : प्रतिनिधी

पाचवीत शिकणार्‍या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग करण्याचा घृणास्पद प्रकार हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये घडला. मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांसह ग्रामस्थांनी थेट शाळेकडे मोर्चा वळविल्यानंतर या शिक्षकाने पोबारा केला. 

दरम्यान, गडहिंग्लज पोलिसांनी शिक्षक अब्दुलरहेमान मकतुम अत्तार (वय 37) याला मंगळवारी सायंकाळी अटक केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी हलकर्णी बाजारपेठेत निषेध फेरी काढण्यात येणार आहे.
अत्तार हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. त्याच्याकडे पाचवीचा वर्ग आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पीडित मुलगी वर्गात बसली असता अत्तारने तिच्याशी लगट करत जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने  मुलगी भयभीत झाली. यापूर्वीही  अत्तार याने असा प्रकार केला होता.

शाळा सुटल्यानंतर  मुलगी घरी आली. ती घाबरलेली पाहून घरच्यांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली. तिने शिक्षकाने केलेला घृणास्पद प्रकार सांगितला. संतप्त  पालकांनी सोमवारी रात्री शाळा प्रशासनाला  जाब विचारल्यानंतर शाळेने अत्तार याला नोटीस काढली. 

या घटनेने मंगळवारी सकाळी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यापूर्वी तेरणी   शाळेत असताना या शिक्षकाने असाच प्रकार केला होता. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी या शिक्षकाला बेदम चोप दिला होता. प्रशासनाने  त्याची बदली  हलकर्णी येथे केली. पुन्हा असाच प्रकार घडल्याने  पालक  व ग्रामस्थ संतप्त झाले. पालकांच्या जोडीला  ग्रामस्थही जमा झाले. त्यांनी शाळेकडे धाव घेतली. जमाव घराकडे येत असल्याची कुणकुण लागताच अत्तारने पोबारा करत कर्नाटक गाठले. संतप्त जमावाने गडहिंग्लज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.  हलकर्णी दूरक्षेत्राकडील पोलिस कर्मचारी संभाजी जाधव व मारुती ठिकारे यांनी अत्तारला खानापूर गेटवर ताब्यात घेऊन गडहिंग्लज पोलिस ठाण्यात आणले.

संतप्त जमाव अन् पोलिसांची शिताफी

अत्तार याने केलेला हा प्रकार हलकर्णीकरांच्या लक्षात आल्यानंतर त्याच्याबद्दल प्रचंड चीड तयार झाली. त्यामुळे संतप्त झालेले लोक त्याच्या घराकडे चाल करून गेले होते. मात्र, याची कुणकुण लागताच त्याने आधीच पोबारा केला. पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य कळल्याने त्यांनी तातडीने त्याचा माग काढत अटक केली; मात्र पोलिस ठाण्यात आणताना त्याला अन्य मार्गाने आणले; अन्यथा जमावाच्या हातून अत्तार याला चांगलाच चोप बसला असता.