Thu, Apr 25, 2019 07:59होमपेज › Kolhapur › कोल्हापूर परिक्षेत्रातील 58 टोळ्यांना ‘मोका’

कोल्हापूर परिक्षेत्रातील 58 टोळ्यांना ‘मोका’

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 12:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत 58 संघटित टोळ्यांच्या म्होरक्यासह साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवजयंती पार्श्‍वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कारवाई केली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण येथील सराईतांचा समावेश आहे.

गंभीर गुन्ह्याच्या कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेल्या 155 जणांना तडीपार करण्यात आले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत किमान दोनशेवर तडीपारीची कारवाई शक्य असल्याचेही सांगण्यात आले. काळेधंदे, शस्त्र तस्करी, बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणून गुन्हेगारीला रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही नांगरे-पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. खून, खुनाचा प्रयत्न, सुपारी बहाद्दर, खंडणी वसुलीसह काळ्या धंद्याच्या माध्यमातून दहशत माजविणार्‍या सराईत टोळ्या तसेच खासगी सावकाराविरुद्ध परिक्षेत्रांतर्गत कठोर कारवाईचे पाचही जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांना सुचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार दाखल मोका प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचेही यावेळी नांगरे-पाटील यांनी सांगितले.