होमपेज › Kolhapur › मोबाईल टॉवर मिळवून देण्याच्या  आमिषाने पावणेतीन लाखांना गंडा 

मोबाईल टॉवर मिळवून देण्याच्या  आमिषाने पावणेतीन लाखांना गंडा 

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:10AMहातकणंगले : प्रतिनिधी

मोबाईल कंपनीचा टॉवर उभा करण्याचे व मोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवून हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील नागनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव आण्णासो देशमुख यांना पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मुख्य सूत्रधार वरुण सेहगल (रा.दिल्ली), राजेंद्र रामचंद्र झगडे (रा.काझड, ता. इंदापूर) व किरण नाना गुरव (रा. निखांगी, ता. इंदापूर) अशी संशयितांची नावे आहेत. देशमुख यांच्या सतर्कतेमुळे झगडे व गुरव यांना पोलिस ठाण्याची हवा खावी लागली तर मुख्य सूत्रधार सेहगल फरार आहे.

नरंदे येथील देशमुख यांना त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये मोबाईल कंपनीचा टॉवर बसविण्यासाठी संमती आहे का, असा फोन दिल्लीच्या वरूण सेहगल याने केला. देशमुख यांनी संमती दर्शवून ऑनलाईन कागदपत्राची पूर्तता करून घेवून सुरवातीला नोंदणी फी म्हणून 14 हजार रुपये भरले. त्यानंतर तत्वत: मान्यता (अ‍ॅप्रुवल) फी म्हणून 61 हजार रुपये भरून घेतले. पुन्हा डिपॉझिट म्हणून 2 लाख भरून घेतले. असे एकूण पावणे तीन लाख रुपये भरून घेतले. 

त्यानंतर देशात 20 हजार टॉवर्स बसविण्याचे असून त्यातील पहिल्या शंभर लाभधारकांना फॉर्च्युनर गाडी भेट देण्याची आहे, अशी बतावणी करून त्यामध्ये तुमची निवड झाल्याचे देशमुख यांना सांगण्यात आले. परंतू गाडीचा निम्मा टॅक्स कंपनी भरणार असून निम्मा म्हणजे सव्वा तीन लाख रूपये टॅक्स त्यांना तातडीने भरण्यास सांगितले. 

यावेळी देशमुख यांना संशय आल्याने त्यांनी कंपनीच्या अधिकार्‍यांना जागा बघण्यास पाठवून द्या, त्यावेळी त्यांच्याकडे टॅक्सची रक्कम देतो, असे सांगितले. त्यानंतर जागा पहाण्यासाठी 
आलेल्या  झगडे व गुरव यांचा देशमुख यांना संशय आल्याने त्यांनी हातकणंगले पोलीसांना घटनेची माहिती दिली व दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. 
त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. या गुन्ह्याची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.