Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Kolhapur › आदमी एक, मोबाईल दो, सीम तीन

आदमी एक, मोबाईल दो, सीम तीन

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 10:07PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मोबाईल आता गरजेची वस्तू बनली आहे. मोबाईलने अवघे जनजीवन व्यापून टाकले आहे. ज्याच्या त्याच्या हातात एक नव्हे तर दोन ते तीन मोबाईल दिसत असून तरुणाई तर चॅटिंगवर कायम व्यस्त आहे. कॉलिंगसाठी एक साधा मोबाईल तर ऑनलाईन चॅटिंगसाठी वेगळा अ‍ॅन्ड्राईड असे दोन मोबाईल वापरले जात आहेत. कॉलिंगचा बॅलन्स असणारे एक व इंटरनेट पॅक असणारे एक तसेच नवीन ऑफर असणारे एक अशी तीन सीमकार्ड एकट्या वापरणार्‍यांची नवीन क्रेझ आली आहे.

सध्या सर्वत्र मोबाईल युगाचा पगडा दिसत असून तरुणाई तर चॅटिंगमध्येच हरवून गेली आहे. हे चॅटिंगच आता सामाजिक समस्या म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे चॅटिंग करणार्‍यांच्या घराघरांतील स्वास्थ्य हरवून गेले असून पालकवर्ग या ‘युवां’च्या आयुष्याबाबत ‘गॅस’वर  राहिला आहे. जिल्ह्यात सध्या नेट वापरणार्‍या ‘नेट’कर्‍यांच्या संख्येत वेगाने वाढ असल्याचेही चित्र आहे.  हायटेक प्रणालीच्या माध्यमातून मोबाईल इंटरनेट व विविध मॅसेजिंग, अ‍ॅप्लिकेशन्सने तरुणाईवर मोहिनी टाकली आहे. यामुळे कॉलिंगएवेजी ऑनलाईन मॅसेज चॅटिंगची सर्वाधिक पसंती देण्याची क्रेझ वेगाने वाढत चालली आहे. 

सध्या मोबाईल युग आहे. लहानांपासून थोरापर्यंत, अशिक्षितापासून सुशिक्षितांपर्यंत सगळ्यांच्या हाती मोबाईल दिसत आहे. जणू माणसांचे आयुष्य मोबाईलने व्यापून टाकले आहे. पारंपरिक दूरध्वनी फोनला ओव्हरटेक करणार्‍या मोबाईलमुळे एस.टी.डी. सेंटरचा रोजगार बंद पडला आहे. शिवाय सहा-सात वर्षांपूर्वी शहरासह खेड्यापाड्यांत दिसणारे क्‍वॉईनबॉक्स आता धूळखात पडले आहेत. एकूणच मोबाईलचा वापर झपाट्याने वाढत गेला. विविध अ‍ॅप्लिकेशनचा वापर करता येऊ शकणारे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल अडीच हजारांपासून मिळू लागल्याने बहुतेकांकडे टचस्क्रिन मोबाईल दिसत आहे. सुरुवातीला बटणाचा साधा मोबाईल ते आताचा टचस्क्रिन अ‍ॅन्ड्राईड मोबाईल या मोबाईल प्रवासाच्या दुनियेत झपाट्याने बदल झाले. त्याचप्रमाणे मोबाईलच्या वापर पद्धतीतही आमूलाग्र बदल झाला आहे. आता तर कॉलिंगपेक्षाही मॅसेज चॅटिंगसाठी मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. तरुणाई मोबाईल इंटरनेटचा वापर करून व्हॉटस् अ‍ॅप, हाईक, हॅगऑऊट, फेसबुक, मॅसेंजर, ट्विटर अशा मॅसेजिंग अ‍ॅप्सवरून चॅटिंग करणार्‍यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.