Sat, Mar 23, 2019 18:43होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : टँकर पेटवला; दूध ओतले

कोल्हापूर : टँकर पेटवला; दूध ओतले

Published On: Jul 18 2018 2:18AM | Last Updated: Jul 18 2018 2:15AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दर आंदोलनाला जिल्ह्यात मंगळवारी दुसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने संकलन ठप्पच राहिले. सर्वाधिक संकलन असलेल्या ‘गोकुळ’चे आज तीन ते साडेतीन लाख लिटर, तर वारणा संघाचे केवळ 44 हजार लिटरच दूध संकलन होऊ शकले. शिरोळ तालुक्यात या आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेने केला. दरम्यान, रात्री उशिरा जयसिंगपूर रेल्वेस्थानकाजवळ दूध वाहतूक करणारा टँकर आंदोलकांनी पेटवून दिला.

दरम्यान, ‘गोकुळ’चे आणखी 14 टँकर मंगळवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात मुंबईला पाठवण्यात आले. सोमवारी रात्री उदगाव (ता. शिरोळ) येथे वारणा संघाचे सहा टँकर कार्यकर्त्यांनी फोडले. हातकणंगले तालुक्यात राजारामबापू संघाच्या टँकरवरही दगडफेक करण्यात आली. 

आज सकाळी कागल-निढोरी मार्गावर दुधाची वाहतूक करणारा ‘गोकुळ’चा टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर सोडून दिले. मुडशिंगी (ता. करवीर) फाट्यावर ‘गोकुळ’चेच दूध घेऊन जाणार्‍या टेम्पोवर कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. 

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे दूध रोखण्याचे आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी ‘गोकुळ’ने शेतकर्‍यांना पाठिंबा म्हणून संकलनच बंद ठेवले होते. वारणा संंघाचे काही प्रमाणात संकलन झाले. आज मात्र या दोन्हीही संघांनी संकलन सुरू ठेवले; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. ‘गोकुळ’चे रोजचे संकलन 11 लाख लिटर आहे. आज दोन्ही वेळचे मिळून त्यांच्याकडे केवळ 5 लाख लिटर संकलन झाले. मात्र, संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी, एकूण संकलनाच्या 57 टक्के संकलन झाल्याचा दावा केला आहे. वारणा संघाचे आजचे संकलन 44 हजार लिटर झाल्याचे समजते. 

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून आजही काही भागांत झोपडपट्टीत  दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. दिव्यांगांच्या काही शाळांतील विद्यार्थ्यांनाही दुधाचे वाटप करण्यात आले. स्वाभिमानीच्या आंदोलनाबरोबरच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचाही फटका संकलनाला बसला. काही गावांत संकलन झाले; पण रस्ते बंद असल्याने संकलित दूध संघापर्यंत पोहोचले नाही.

गुजरातचे 35 टँकर परत

गुजरातमधून मुंबईला ‘अमूल’कडून मोठा दूधपुरवठा होतो. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर संघटनेचे खासदार राजू शेट्टी आज सकाळी स्वतः गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचले. त्यावेळी सीमेवर मुंबईला येणारे 25 टँकर थांबले होते, हे सर्व टँकर शेट्टी यांनी परत पाठवले. त्यानंतर मुंबईला येणारे आणखी दहा टँकर शेट्टी यांनी परत पाठवले. अजूनही शेट्टी हे या सीमेवरच थांबून आहेत. 

सोमवारचे टँकर पोहोचले

‘गोकुळ’चे 24 टँकर सोमवारी पोलिस बंदोबस्तात मुंबईला पाठवण्यात आले होते. यापैकी पाच-सहा टँकर पुण्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरले, उर्वरित 17 टँकर मुंबईत पोहोचले. आज दुपारी पुन्हा 14 टँकर पोलिस बंदोबस्तात मुंबईला पाठवण्यात आले. 

संकलन घटले ः पाटील

स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे ‘गोकुळ’चे संकलन घटले आहे. आज दोन्ही वेळचे मिळून 57 टक्के संकलन झाले. मुंबईला आज दुधाचे 14 टँकर पोलिस बंदोबस्तात पाठवण्यात आले. उद्या (बुधवारी)ही ‘गोकुळ’चे संकलन सुरूच राहील, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली.