कोल्हापूर ः प्रतिनिधी
शासनाने गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 25 रुपये वाढ दूध संघांनी करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिवसाला 60 लाख, तर महिन्याला 18 कोटी रुपये जास्त मिळणार आहेत. आजपासून (दि. 21) या नव्या दरवाढीची अंमलबजावणी होत आहे.
जिल्ह्यात गाईचे दूध सुमारे 12 लाख लिटर संकलित होते. यापैकी तीन-चार लाख लिटर दुधापासून पावडर तयार केली जाते. उर्वरित दूध पिशवीतून विकले जाते. दूध पावडरचे दर घसरल्याने जिल्ह्यातील गोकुळ, वारणासह सर्व खासगी संघांनी गाय दूध खरेदी दरात मोठी कपात केली होती. गेल्या वर्षी शासनाने गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर 27 रुपये निश्चित केला होता; पण संघांनी मात्र या दरात कपात करून काही जिल्ह्यांत तो प्रतिलिटर 17 ते 20 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला. ‘गोकुळ’कडून कार्यक्षेत्रातील गाय दूध प्रतिलिटर 20 रुपये, तर कार्यक्षेत्राबाहेरील दूध 17 रुपये दराने खरेदी केले जात होते.
गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी 16 जुलैपासून दूध बंद आंदोलन केले. त्याची दखल घेऊन शासनाने गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर 25 रुपये निश्चित केला. यासाठी पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान शासनाकडून संघाला दिले जाणार आहे. मात्र, संघांना संकलित होणार्या गाईच्या सर्वच दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर द्यावा लागणार आहे.
जिल्ह्यात दूध संकलन करणार्या गोकुळ, वारणा या प्रमुख संघांसह इतर संघांकडे रोज सुमारे 12 लाख लिटर गाईचे दूध संकलित होते. प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ उद्यापासून
लागू होणार असल्याने उत्पादकांना दररोज 60 लाख रुपये, तर महिन्याला 18 कोटी रुपये जादा मिळणार आहेत.
आजपासून ‘गोकुळ’ची दरवाढ
शासनाच्या नव्या आदेशानुसार गाईचा दूध खरेदी दर प्रतिलिटर 25 रुपये करण्याचा निर्णय ‘गोकुळ’च्या संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. आजपासून (दि. 21) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
रविवारी अध्यादेशासाठी बैठक
गाईच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये देण्याबाबतचा शासकीय आदेश काढण्यासाठी रविवारी राज्यातील प्रमुख दूध संघ प्रतिनिधींची बैठक मुंबईत दुग्ध विकास आयुक्तांच्या दालनात होत आहे. या बैठकीत अध्यादेशाचा मसुदा निश्चित होईल, त्याचदिवशी किंवा सोमवारी नवा आदेश निघेल.