Wed, Jul 08, 2020 00:55होमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’च्या अंकाचा संदर्भ देत दूध उत्पादकांच्या समस्या मांडल्या संसदेत

पोषण आहारात दूध पावडरचा समावेश करण्याची खा. महाडिक यांची मागणी

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 1:32AM

बुकमार्क करा
नवी दिल्ली ः प्रतिनिधी

शालेय पोषण आराहात दूध पावडरचा समावेश करण्याची जोरदार मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात केली. लोकसभेत शून्य प्रहरात बोलताना महाडिक यांनी दूध व्यवसायाचा आढावा घेत त्यातील समस्या मांडल्या. दैनिक ‘पुढारी’चा अंक सभागृहात दाखवत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे संदर्भ देत दूध आणि दूध पावडरला अनुदानाची मागणीही त्यांनी केली.

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभासदांनी 7 डिसेंबरला आयोजित केलेल्या मोर्चात दर आणि उत्पादन खर्च याबाबत संसदेत आवाज उठवू, असे आश्‍वासन खा. महाडिक यांनी दिले होते. दुधाला प्रतिलिटर पाच आणि दूध पावडरला प्रतिकिलो सात रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी खा. महाडिक यांनी केली. उत्पादन खर्चाशी निगडित दूध दर मिळावा, यासाठी केंद्र सरकारने अनुदान देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दूध उत्पादनात जगात भारत अग्रेसर आहे. देशात 177 मिल्क फेडरेशन, 15 दूध मार्केटिंग फेडरेशन काम करीत असून, जागतिक दूध उत्पादनात भारताचा 17 टक्के वाटा असूनही उत्पादक मात्र वंचित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हणूनच शासनाने दूध उत्पादकास आर्थिक आधार दिला पाहिजे. तसे झाल्यास या व्यवसायाशी निगडित असणार्‍या सात कोटी नागरिकांना लाभ होणार आहे.

दुभत्या जनावरांचे पशुखाद्य, औषधोपचार यावर मोठा खर्च होतो आहे. स्वामिनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळणे आवश्यक आहे. तो मिळत नसल्यानेच कोल्हापुरात प्रचंड मोठा मोर्चा निघाल्याचे खा. महाडिक यांनी लोकसभेत सांगितले. त्याबाबत दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे पुरावे त्यांनी सादर केले. आपले मत मांडत असताना खा. महाडिक यांनी सभागृहात दैनिक ‘पुढारी’चा अंक दाखविला. दूध उत्पादकांच्या समस्यांवर उपाय म्हणून अनुदानाबरोबरच शासकीय गोदामातील खराब धान्य पशुखाद्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.