Tue, May 21, 2019 18:21होमपेज › Kolhapur › दूध कोंडी कायम; महामार्ग रोको

दूध कोंडी कायम; महामार्ग रोको

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 19 2018 1:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून सुरू केेलेल्या दूध दर आंदोलनामुळे बुधवारी सलग तिसर्‍या दिवशीही जिल्ह्यातील दूध कोंडी कायम राहिली. दरम्यान, गायीच्या दूध दराला अनुदान देण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने संघटनेच्या वतीने उद्या (गुरुवारी) किणी टोल नाक्यावर कुटुंबीय आणि जनावरांसह चक्‍काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महामार्गावर बुधवार सायंकाळपासूनच प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

‘गोकुळ’चे 16 व वारणा दूध संघाचे 5 असे 21 टँकर प्रचंड पोलिस बंदोबस्तात मुंबई, पुण्याला पाठवण्यात आले. या आंदोलनाला पावसाचीही साथ मिळाली. नद्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातून येणारा दूधपुरवठाही थांबला. शिरोळ, हातकणंगले तालुक्यात मात्र या आंदोलनाची धार कायम होती. दरम्यान, गुरुवारी किणी टोल नाक्यावर कुटुंबीय व जनावरांसह दूध उत्पादक चक्‍काजाम आंदोलन करणार आहेत.

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान थेट उत्पादकांच्या खात्यावर जमा करावे,या मागणीसाठी संघटनेने सोमवारपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे दूध रोखण्याचे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांत दूध वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रकार सुरू आहेत. शिरोळमध्ये एका टँकरला आग लावण्यात आली, तर कागल-निढोरी मार्गावरही टँकर अडवून त्यातील दूध  रस्त्यावर सोडण्यात आले.

बुधवारी ‘गोकुळ’चे सुमारे 4 लाख 25 हजार, तर ‘वारणा’चे एक लाख लिटर दूध संकलन झाले.आंदोलनाबरोबरच पावसाने रस्ते बंद असल्याचा परिणामही संकलनावर झाला असून, ‘गोकुळ’चे 16 टँकर आज दुपारी बंदोबस्तात मुंबई, पुण्याला पाठवल्याची माहिती अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली.

आजही शिये-भुये मार्गावर दुधाचा टेम्पो अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्यात आले. गडमुडशिंगीतही दुधाचा टेम्पो अडवून दूध ओतण्यात आले. याच गावांत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शंभर लिटर दुधाचे मोफत वाटप केले. शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत संघटना प्रभावी असल्याने या ठिकाणी संकलन ठप्प आहे. इतर तालुक्यांत संकलनाला फारसा प्रतिसाद नसला, तरी पावसामुळे दूध संघापर्यंत पोहोचले नाही.

मुंबईत दूधटंचाई

मुंबईकरांना दूधपुरवठा कमी पडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तामध्ये दूध टँकर आणण्याचे प्रयत्न दूध उत्पादक संघांकडून केले जात असले, तरी आंदोलनकर्त्यांनी मुंबईकडे निघालेल्या गाड्यांची नाकाबंदी करण्याचा बुधवारी जोरदार प्रयत्न केला, त्यामुळे दूध उत्पादक संघांकडून येणार्‍या एकूण साठ्यात 5 ते 10 टक्के दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूधटंचाई जाणवणार आहे. मुंबईच्या आसपास असलेल्या दूध संघांच्या प्रक्रिया केंद्रांत आधीच्या दोन दिवसांचा साठा शिल्‍लक असल्याने त्याची तीव्रता दोन दिवसांनंतर आणखीनच वाढणार आहे.

शेट्टी-महाजन चर्चा

दूध कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वाभिमानीचे नेते खा. राजू शेट्टी यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले. उभयतांची बैठक पहाटेपर्यंत चालण्याची शक्यता होती. मात्र, या बैठकीतून काहीही निष्पन्‍न होण्याची आशा नाही. गुरुवारी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच काय तो निर्णय होऊ शकतो. त्यामुळे गुरुवारचे महामार्ग रोको आंदोलन ठरल्याप्रमाणेच होईल, असे शेट्टी यांच्या निकटच्या वर्तुळातून सांगण्यात आले.