Thu, Aug 22, 2019 12:28होमपेज › Kolhapur › दूध वजनाने की मापाने!

दूध वजनाने की मापाने!

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 11:03PMकुडित्रे : प्रतिनिधी

दुग्धविकास विभाग आणि वैधमापनशास्त्र विभाग यांनी कायद्यानुसारच इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याऐवजी मापाने दूध संकलन न करणार्‍या संस्थांवर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असंतोष पसरला आहे. त्यातच सांगरूळ (ता. करवीर) येथे दूध संस्थांच्या दूधवाढीत भर पडून दूध उत्पादकांचा तोटाच होत असल्याचे निदर्शनास आल्याने दूध उत्पादक संभ्रमात पडेल आहेत. कायदा व व्यवहार यांची सांगड घालून हा प्रश्‍न सोडवा, अशी मागणी करीत दूध उत्पादकच   मापाच्या पद्धतीस विरोध करीत आहेत.

संभाजी ब्रिगेडने कायद्याचा आधार घेत इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने दूध संकलन करण्यास आक्षेप घेतल्याने जिल्ह्यातील दूध वेगळ्या अर्थाने उतू जात आहे. सांगरूळ (ता. करवीर) येथे गुरुवारी दुग्धविकास विभागाच्या अधिकार्‍यांसमोर दूध संस्थांनी लिटर मापाने दूध संकलन केले. बलाढ्य चार संस्थांच्या माध्यमातून दररोज सुमारे साडेपाच हजार लिटर संकलन होते. एवढे दूध लिटरने मापून घेणे केवळ अशक्यच नाही, तर व्यवहार्यही नाही. गुरुवारी सकाळी 6 वाजता संकलनास सुरुवात झाली आणि संकलन पूर्ण होण्यास दहा वाजले. तब्बल पाच तास संकलन सुरू राहिल्याने उत्पादकांना रांगेतच तिष्टावे लागले. लिटरने दूध घेताना धार कमी-अधिक पडते, त्यामुळे दूध संस्थांच्या दूधवाढीत भरच पडली. तोटा दूध उत्पादकांचाच झाला. 

तब्बल 64 लिटर दूधवाढ

सांगरूळ, करवीरच्या पश्‍चिम भागातील दूध उत्पादकांची पंढरी असलेलं गाव. संस्थांत निकोप स्पर्धा. पारदर्शक कारभार. येथील दत्त सहकारी दूध संस्थेने 1,100 लिटर्स दूध संकलन केले. संकलनानंतर एकूण 64 लिटर्सची वाढ आली. नियमित ही वाढ 45 लिटर्सच येत असे, असे सचिव बाजीराव तोरस्कर यांनी सांगितले. लिटर मापाने तब्बल 19 ते 20 लिटरने वाढीत भर पडली. हरहर महादेव दूध संस्थेतही 31 लिटर्सने वाढ अधिक आल्याचे सचिव दत्ता बोळावे यांनी सांगितले. मोठ्या दूध उत्पादकांचे दूध लिटरने मोजताना प्रत्येक लिटरमागे धार पडल्याने जादा दूध जात असल्याचे संस्थांचे म्हणणे आहे.

वासाच्या दुधात वाढ

गायी-म्हशीच्या कासेतून दूध निघाल्यानंतर तीन तासांच्या आत त्यावर प्रक्रिया झाली पाहिजे; अन्यथा दूध नासण्यास सुरुवात होते. बॅक्टेरिया काऊंट वाढल्याने प्रत खराब होते. सांगरूळमध्ये 6 वाजता काढलेले दूध ‘गोकुळ’मध्ये 11 वाजता पोहोचल्याने 1,500 लिटर दूध वासाचे (कमी प्रतीचे) निघाले.

परस्परविरोधी दावे!

इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर 49 मि.लि. दूध वजनात धरले जात नाही; पण 51 मि.लि. वजन दूध 100 मि.लि. मोजले जाते. फॅट सॅम्पलचे दूध परत मिळत नाही. शेतकर्‍यांची लूट होते, असा दावा वजनकाट्याला विरोध करणार्‍यांचा आहे, तर सॅम्पल दुधाचे स्वतंत्र खाते असल्याने त्याचा हिशेब नफा-तोटा पत्रकाला येतो. 49 मि.लि दूध जरी वजनात धरले नाही, तरी ते आपोआप नफा-तोटा पत्रकाला आल्याने शेवटी ते दूध उत्पादकांच्या खिशातच जाते.

वाढीव कामगारांचा भुर्दंड

लिटर मापाने दूध घेतले तर सध्याच्या कामगार संख्येत दुपटीने वाढ करावी लागेल. त्यांचा पगार संस्थेवर खर्च पडणार आहे. त्याची चाट दूध उत्पादकांनाच बसेल, असा संस्थांचा दावा आहे. दूध मापाने की वजनाने, हा मुद्दा आता वादाचा होत आहे. संकलन कमी होते तेव्हा माप ठीक होते; पण आता संकलन दसपटीने वाढले आहे. त्यामुळे लिटरने माप कायदेशीर असले, तरी व्यवहार्य आहे काय? याचा विचार करण्याची गरज आहे.केवळ मुद्दा प्रतिष्ठेचा झाला, तर दूध उत्पादकांचेच नुकसान होणार आहे. नव्या पद्धतीच्या दोषांची वजाबाकी करून प्रश्‍न सोडवण्याची गरज आहे.