Wed, Apr 24, 2019 16:33होमपेज › Kolhapur › दुधाचे होणार विरजण!

दुधाचे होणार विरजण!

Published On: Mar 01 2018 1:39AM | Last Updated: Mar 01 2018 12:06AMकुडित्रे : प्रतिनिधी 

दूध संस्थांनी उत्पादकांकडून इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांऐवजी पारंपरिक लिटर  मापानेच  दूध संकलन व विक्री करावे, असा आदेश वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांनी दिलेत. त्याची आज (दि.1) पासून अंमलबाजवणी करण्याचा फतवा काढला आहे. या आदेशामुळे प्राथमिक सहकारी दूध संस्थांबरोबर दूध उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ज्या दूध संस्थांचे संकलन एक हजार लिटरपेक्षा जास्त आहे. अशा संस्थांना वेळेत दूध संकलन करणे जिकिरीचे होणार आहे. संकलनाला थोडा जरी वेळ झाला तर दूध संघांपर्यंत पोहोचेपर्यंत नासण्याची भीतीही आहे. त्यामुळेच आधुनिकतेकडून परत पारंपरिकतेकडे जाण्यास भाग पाडणार्‍या या  उलट्या आदेशाविरुद्ध दूध संकलनच बंद करण्याचा इशारा दूध संस्थांनी दिला आहे.

पारंपरिक लिटर मापातच पाप!

17-18 वर्षांपूर्वी प्रत्येक सभासदाचे दूध उत्पादन 2 ते 3 लिटर एवढेच असायचे. आता संकरित गायींमुळे एका दूध उत्पादकाचे दूध 40 ते 50 लिटरच्या घरात आहे. पूर्वी संस्थांचे दैनंदिन संकलन 100 ते 150 लिटर्सच्या दरम्यान होते. धवलक्रांतीमुळे संस्थात्मक संकलन दैनंदिन 3000 ते 3500 च्या घरात गेले आहे. हे सर्व मापाने मोजणे केवळ अशक्य आहे. पूर्वी मोठी संकलने लिटरवर (मापाने) करताना चुका होऊन दूध उत्पादकांचा तोटा होत असे. लिटरने संकलन करताना देखील धार सोडूनच वाढ काढली जात असे. पूर्वी मापाचे तळ मारणे, धार सोडून घेणे, मोजताना विस्मरण होऊन चुका होणे या तक्रारी असायच्या. त्यामुळे वजन काट्यावर वजन करून संगणकीकृत बिले देण्याची पद्धत आली. मनुष्यबळ कमी झाले. आता परत लिटरने माप करायला लावणे म्हणजे ‘जग चंद्रावर आणि आपण डोंगरावर’ अशी परिस्थिती असल्याची तिखट प्रतिक्रिया दूध उत्पादक रत्नाबाई पाटील (दोनवडे), शालाबाई शेलार, सखुबाई शेलार (कुडित्रे), एकनाथ नाळे (सांगरूळ) या दूध उत्पादकांनी दिली.