Mon, May 20, 2019 08:33होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात दूध संघ संकलन सुरळीत

कोल्हापुरात दूध संघ संकलन सुरळीत

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 1:20AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

सोमवारपासून चार दिवस सुरू असलेले दूध दराचे आंदोलन गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागे घेतल्याने शुक्रवारपासून दूध संकलन सुरळीत झाले. गावागावांत पहाटेपासूनच दूध काढण्याबरोबरच ते डेअरीत घालण्यासाठीची लगबग सुरू होती. आंदोलनामुळे बंद असलेल्या डेअरींचा भोंगाही शुक्रवारी वाजला.

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे यासाठी 16 जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध आंदोलन सुरू केले होते. पहिल्या दिवशी या आंदोलनाला जिल्ह्यात सर्वाधिक संकलन असलेल्या गोकुळ संघाने पाठिंबा दिल्याने संकल ठप्प राहिले. वारणा दूध संघाचे संकलन सुरू होते; पण त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

गावागावांत संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय असल्याने संकलन सुरू असूनही उत्पादकांनी डेअरीकडे पाठ फिरवली. त्यातूनही ‘गोकुळ’ने काही भागांत दूध संकलित केले. पावसामुळे काही गावांतील रस्तेच  बंद झाल्याने त्याचा परिणाम संकलनावर झाला. दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा निर्णय गुरुवारी रात्री नागपूर येथे झाला. संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही हा निर्णय मान्य करून आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर शुक्रवारी दूध संकलन सुरळीत सुरू झाले. नद्यांचा पूरही ओसरल्याने ‘गोकुळ’च्या संकलनातही वाढ झाली. 

वारणा दूध संघाचे आंदोलन काळातही संकलन सुरू होते. शुक्रवारपासून त्यांचेही संकलन सुरळीत झाले. अपेक्षित निर्णय झाल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आज (दि. 21) संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांचे पुणे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात येणार आहे. 

दूध दर आंदोलन यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादक खुशीत आहेत. आंदोलक आणि सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.