होमपेज › Kolhapur › राज्यात पोलिस व महसूल खाते लाचखोरीत आघाडीवर

राज्यात पोलिस व महसूल खाते लाचखोरीत आघाडीवर

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 11:32PM

बुकमार्क करा

म्हाकवे : डी. एच. पाटील

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यावर्षी जानेवारीपासून 716 प्रकरणांत 946 अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले आहेत. कारवाई झालेल्यांत महसूल व पोलिस खातेच आघाडीवर आहे.
देशात प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याला आळा घालण्याचा प्रयत्न करत असले, तरी राज्यात अनेक प्रकरणांतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. राज्यात सर्वात जास्त लाचखोरी ही पोलिस व महसूल खात्यामध्येच घडत असल्याचे चित्र समोर आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी 2017 पासून आतापर्यंत सापळा लावून केलेल्या कारवाईत 716 प्रकरणांत यश आले आहे. त्यात वर्ग-1 च्या 67, वर्ग-2 च्या 80, वर्ग-3 च्या 595, तर वर्ग-4 च्या 40 जणांना अटक करण्यात आली आहे. यावरून भ्रष्टाचारात वर्ग-3 चा लिपिक वर्ग आघाडीवर असल्याचे दिसून येते. या सर्वांकडून सुमारे दोन कोटी 2 लाख 35 हजार 810 रुपये जप्त करण्यात आले आहेत. महसूल विभागातील 174 प्रकरणांत 236 जणांना अटक करून लाचलुचपतकडून 45 लाख 60 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. 

पोलिस विभागातील 138 प्रकरणांत 181 जणांवर कारवाई करून 15 लाख 60 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. सन 2016 मध्ये केलेल्या कारवाईत 985 प्रकरणांत 16 हजार 256 जणांना अटक करण्यात आली होती. तर त्यांच्याकडून 2 कोटी 68 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. पोलिस विभागात 228 प्रकरणांत 300 जणांवर कारवाई करून 47 लाख 18 हजार रुपये जप्त करण्यात आले होते.
लाच प्रकरणात अडकलेल्या कर्मचार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यात अनेकांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यापैकी 16 प्रकरणांतील आरोपींची मालमत्ता गोठवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. भ्रष्टाचारामुळेे विकासकामांत अडथळे निर्माण होत आहेत.