होमपेज › Kolhapur › औषध घोटाळ्याची व्याप्ती वाढणार

औषध घोटाळ्याची व्याप्ती वाढणार

Published On: Mar 01 2018 1:38AM | Last Updated: Mar 01 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील घोटाळ्याची व्याप्ती वाढू लागली आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्यासाठी मागील 9 वर्षांपासून झालेल्या औषध खरेदीची चौकशी होणार आहे. त्यामुळे या काळात औषध खरेदीशी संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच या विभागात काम करणार्‍या अर्थ विभागाच्या अधिकार्‍यांचीही चौकशी करण्याचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले.कोट्यवधी रुपयांचा औषध घोटाळा या चौकशीतून उघड होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या औषध खरेदीत अनियमितता झाल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. एका वर्षात साधारण 16 लाखांचा घोळ झाला आहे. याचीच आणखी सखोल चौकशी झाल्यास या आकड्यात आणखी वाढ होणार आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केला असून मागील 9 वर्षांच्या खरेदीची चौकशी करण्याचे संकेत त्यांनी दिले. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार्‍यांचा आवाज थंड झाल्याने हे प्रकरण दडपणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, डॉ. खेमनार यांनी हे सर्व प्रकरण धसास लावण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याने, संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसात 8 ते 10 अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाणार असल्याचे डॉ.खेमनार यांनी यावेळी सांगितले.

औषध खरेदी करताना ते नियमानुसार आहे किंवा कसे याबाबतची खबरदारी घेण्याची जबाबदारी वित्त विभागाची आहे. यासाठी वित्त विभागाचे अधिकारी व कर्मचारी या विभागात कार्यरत आहेत. या अधिकार्‍यांनी नेमके काय पाहिले, याचीही चौकशी सुरू केली आहे. तसेच त्यांनी यापूर्वी ज्या विभागात काम केले आहे, तेथील कामाचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागातील घोटाळ्याची फाईल वित्त विभागाच्या अधिकार्‍यांनी तपासली आहे. मात्र, त्यांनी आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सेफ करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीस नेमलेल्या अधिकार्‍यांनी या प्रकरणात हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचार्‍यांचे जुने कारनामे उघड होणार आहेत.