होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी मोठा ‘डाव’

महापौरपदासाठी मोठा ‘डाव’

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 11:04PMकोल्हापूर : सतीश सरीकर 

दिल्लीत भाजप... राज्यात भाजप... एवढेच काय, कोल्हापूर जिल्हा परिषदेतही भाजप... मग कोल्हापूर महापालिकेतच का नाही?... नाही म्हटले तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मनात ही सल आहे... त्यामुळेच काहीही चमत्कार करा अन् महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा, असे आदेश देण्यात आले आहेत... भाजप-ताराराणी आघाडीकडून काँग्रेस-राष्ट्रवादीमधील फुटीर नगरसेवकांसाठी ‘कोटीच्या’ उड्डाणांची ‘ऑफर’ देण्यात आल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे... परिणामी, काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही ‘घोडेबाजाराची शक्यता’ गृहीत धरली जात आहे... काहीही झाले तरी यंदाच्या ‘महापौरपदासाठी’ विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडून मोठा ‘डाव’ टाकण्यात येत आहे... ‘एकदाच लढायचे आणि अडीच वर्षे महापौरपद घ्यायचे’ असा निर्धार केला असल्याचे सांगण्यात येते.  

कोल्हापूर महापालिकेचे सभागृह नोव्हेंबर 2015 पासून अस्तित्वात आले. सुरुवातीची अडीच वर्षे ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) महिलांसाठी महापौरपदाचे आरक्षण होते. त्याची मुदत आता 15 मे 2018 ला संपणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपदाचे आरक्षण आहे. सभागृहाची मुदत संपेपर्यंत हे आरक्षण राहणार आहे. परिणामी, काय ताकद लावायची ती आत्ताच लावायची, असा विचार भाजप-ताराराणी आघाडीकडून केला जात आहे. महापालिकेची ‘सत्ता’ काबीज करून कोणत्याही स्थितीत भाजपचाच महापौर होणार, असेही ठामपणे सांगितले जात आहे. त्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांत सुरू आहे. महापालिकेत भाजपचा महापौर हेच एकमेव ‘टार्गेट’ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत भाजप-ताराराणी आघाडीच्या ‘निशाण्यावर कोल्हापूर महापालिका’ आहे. तसेच महापौरपदाच्या निवडीनंतर थेट महापालिकेत ‘सत्तांतर’ घडवायचे, यासाठी भाजप-ताराराणी आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे; परंतु हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत काठावरचे बहुमत आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणत्याही स्थितीत जिंकायचीच, असा चंग भाजप-ताराराणी आघाडीने बांधला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फोडून भाजपने आपला सभापती केला आहे. साहजिकच, भाजपचा आत्मविश्‍वास वाढला असल्याने महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नाराज नगरसेवकांना हेरले जात आहे. विश्‍वासू कारभारी त्यांच्या  संपर्कात राहिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतील ‘असंतुष्ट’ फुटीर नगरसेवकांना ‘गळ’ टाकायला सुरुवात केली आहे.