Tue, May 21, 2019 00:29होमपेज › Kolhapur › शाहू महाराजांची समाधीची इच्छा पूर्ण होणार कधी?

शाहू महाराजांची समाधीची इच्छा पूर्ण होणार कधी?

Published On: Jun 26 2018 8:52AM | Last Updated: Jun 26 2018 8:52AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाधीची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला. त्यासाठी 4 कोटी 18 लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. महापालिका निधीतून कामही सुरू करण्यात आले; परंतु साडेचार वर्षे झाली अद्याप समाधीचे काम पूर्ण झालेले नाही. परिणामी शाहू महाराजांची समाधीची इच्छा पूर्ण होणार कधी? असा प्रश्‍न शाहूप्रेमीतून उपस्थित केला जात आहे. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे 6 मे 1922 ला मुंबईत निधन झाले. दुसर्‍या दिवशी पंचगंगा नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टाऊन हॉल बागेसमोर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मृती मंदिर आहे. (शाहूकालीन नर्सरी बाग) त्याठिकाणी आपली समाधी व्हावी, असा ठराव शाहू महाराज यांनी केला होता. कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या मालकीची रि. स. नं. 2948, सी वॉर्ड या मिळकतीचे क्षेत्र 4765.90 चौ. मी. असून त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह ही इमारत व बगीचा आहे. उर्वरित जागा रिकामी आहे. मंजूर विकास योजनेच्या प्रस्तावानुसार ही जागा ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे. महापालिका ठराव क्र. 80 (28 फेब्रुवारी 2013) नुसार ही जागा ग्रीन झोनमधून वगळून सार्वजनिक, निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 37 नुसार फेरबदल प्रस्ताव सादर करण्यास मान्यता झाली आहे. त्यानुसार त्याठिकाणी शाहूंचे समाधी स्मारक साकारणार आहे. 

29 नोव्हेंबर 2013 ला समाधीस्थळाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. शाहूंचे समाधीस्थळ साकारण्यासाठी महापालिका निधीतून 1 कोटी 3 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअंतर्गत बहुतांश सिव्हील वर्क पूर्ण झाल्याचेसांगण्यात येते. समाधीस्थळावर ब्राँझची मेघडंबरी बसविण्यात येणार आहे. त्याचे काम अवघड असून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून तो साकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेघडंबरीचे काम 80 टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. उर्वरित काम पूर्ण झाल्यावर समाधीस्थळावर मेघडंबरी बसविण्यात येईल. त्यानंतर समाधीचे काम पूर्ण होईल. 

समाधीस्थळाभोवती कंपौंड घालण्यासाठी 1 कोटी, 7 लाखांची निविदा महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. लवकरच त्याची तांत्रिक छाननी होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर कंपौंडचे काम सुरू करण्यात येणार आहे, असे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.