Wed, Nov 21, 2018 13:15होमपेज › Kolhapur › लग्न समारंभात नातेवाईकांत हाणामारी

लग्न समारंभात नातेवाईकांत हाणामारी

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 05 2018 12:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

बोहल्यावर चढण्यापूर्वी वधूला मामाने खांद्यावर उचलून नेण्याची प्रथा आजही काही लग्न समारंभांत पार पडते. शुक्रवारी कळंबा येथील एका कार्यालयात याच प्रथेवरून वधू आणि वरपक्षांतील नातेवाईकांत वाद झाला. वाद विकोपाला जाऊन झालेल्या हाणामारीत दोन महिलांसह काही जण जखमी झाले. मात्र, याची नोंद पोलिसांत झाली नाही. 

कळंबा येथे कार्यालयात शुक्रवारी विवाह सोहळ्यासाठी नातेवाईक जमले. अक्षतांची वेळ जवळ आल्याने वधूला स्टेजवर बोलाविण्यात आले. वधूला मामाने खांद्यावरून किंवा काखेतून घेऊन जाण्याची प्रथा असल्याने वधूपक्षाने तसे केले. पण, याला काही नातेवाईकांनी आक्षेप घेतला. अक्षता रोपणाला उशीर होत असल्याने नातेवाईकांतील वाद आणखीन विकोपाला जात त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. भरलेल्या कार्यालयात घडलेल्या प्रकाराने गोंधळ उडाला. काही ज्येष्ठांनी मध्यस्थी करीत भांडण सोडविले. यामध्ये दोन महिलांसह काही जण किरकोळ जखमी झाले. एका महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेले. परंतु, याची नोंद रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.