Sat, Apr 20, 2019 08:14होमपेज › Kolhapur › ‘मराठी’ला अभिजात दर्जासाठी किती हुतात्मे हवेत?

‘मराठी’ला अभिजात दर्जासाठी किती हुतात्मे हवेत?

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 04 2018 11:29PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतचे सर्व निकष पूर्ण केले असताना केंद्र सरकारचा अन्याय का? मराठी भाषिक संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आणखी किती हुतात्मे हवे आहेत, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली. 

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसतर्फे बडोदा येथे आयोजित 91 व्या मराठी साहित्य संमेलनपदी निवडीबद्दल डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. डॉ. सबनीस म्हणाले, लेखकांचे खासगी चारित्र्य प्रेरक नसेल तर त्यांच्या कलाकृती चांगल्या असण्याबाबत संभ्रम वाढतो. काही लेखक रंजकतेत वाहत जातात. अलीकडे शासनाने मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मराठी मरून चालणार नाही. 12 कोटी लोकांचा श्‍वास गमाविल्यासारखे आहे. मराठी भाषेसाठी स्वतंत्र कायदा केला पाहिजे.

आज सगळी क्षेत्रे बरबटत चालली आहेत. मराठी लेखकांनी प्रेम व अलिंगनाच्या कविता लिहिण्यापेक्षा भूख, भ्रष्टाचारमुक्तीवर लिहिले पाहिजेे. संस्कृती व साहित्याचे शुद्धीकरण महत्त्वाचे आहे. 75 टक्के संपत्ती ही मूठभर लोकांकडे आहे, त्यामुळे ही खरी लोकशाही नसल्यासारखे वाटते. लेखक, साहित्यिकांनी राजकारण, आर्थिक शोषणावर भिडणारे लेखन केले पाहिजे. डॉ. देशमुख यांचा प्रवास प्रशासकीय ते सांस्कृतिक असा झाला असून त्यांचे लेखन वास्तववाद आणि कल्पनांचे मिश्रण आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. देशमुख म्हणाले, आभाळाऐवढी मोठी माणसे असल्याने जिल्हा प्रगत आहे. आयुष्यातील सर्वात जास्त लेखन येथेच झाले. शाहू महाराजांची भूमी ते सयाजीराव गायकवाड यांच्या बडोद्यापर्यंतचे अनुबंध विलोभनिय आहेत. प्रत्येकाने मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे. मराठी विद्यापीठ व मराठी लर्निंग अ‍ॅक्ट आणण्यासाठी दबाव आणला पाहिजे. मराठी वाङ्मय वाचले पाहिजे. शालेयस्तरावर ग्रंथालयाचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. प्रास्ताविक आर. डी. पाटील यांनी केले. स्वागत ए. डी. निकम यांनी केले. संस्था परिचय प्रा. विनय पाटील यांनी करून दिला. पाहुण्यांचा परिचय प्रा. सी. एम. गायकवाड यांनी केला. आभार यू. एम. पाटील यांनी मानले. 

यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष डी. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष एस. आर.चरापले, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. जयसिंगराव पवार, एस. डी. लाड, आर. वाय. पाटील, ललिता सबनीस, अंजली देशमुख आदी उपस्थित होते.