होमपेज › Kolhapur › संतप्‍त सीमावासीय कोल्‍हापुरात ताब्यात

संतप्‍त सीमावासीय कोल्‍हापुरात ताब्यात

Published On: Jan 23 2018 5:38PM | Last Updated: Jan 23 2018 5:38PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकचे गोडवे गाणार्‍या कवितेमुळे सीमावासीयांत प्रचंड असांतोष निर्माण झाला आहे. मंगळवारी सीमावासीय प्रचंड आक्रमक होऊन पालकमंत्री पाटील यांच्या राजिनाम्याची मागणी करीत निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. आंदोलक आणि पोलिसांत यावेळी चांगलीच झटापट झाली. यावेळी ५० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, समिती नेते मदन बामणे, अमर येळ्ळूरकर, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, रत्न प्रसाद पवार, युवा कार्यकर्ते पीयूष हावळ आदींसह ५० हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जन्मावे तर कर्नाटकात, या मंत्री पाटील यांच्या वक्‍तव्यामुळे सीमाभागासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वक्‍तव्याच्या निषेधार्थ आणि पालकमंत्री पाटील यांनी माफी मागून राजिनामा द्यावा, अशी मागणी करत सीमाबांधव त्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यासाठी मंगळवारी सकाळीच कोल्हापुरात दाखल झाले. युवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांना वंदन करुन कोल्हापूरकडे कुच केली. दहा वाहनांतून चाळीस ते पन्‍नास कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले. सायबर चौकातून रिंगरोडमार्गे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांची वाहने थेट संभाजीनगर आगारात नेली. पोलिस अधिक्षक संजय मोहीते, यांनी सीमावासीयांची समजूत काढणयाचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांचा हेतू अपमान करण्याचा नव्हता. त्यांनी तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शांततेने निदर्शने करा. मात्र, मंत्री पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. 

मंत्री पाटील यांनी आमच्या घरात येऊन आमचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या निवास्थानासमोर जाऊन आंदोलन करणार असा आग्रह आंदोलकांनी धरला. मात्र पोलिस अधिक्षक मोहिते यांनी निवासस्थानापासून शंभर फूट अंतरावर झाडाखाली तुम्ही आंदोलन करा, अशी विनंती केली. आंदोलकांनी संभाजीनगर बस आगारातून घोषणाबाजी करीत निवासस्थानाकडे रवाना झाले. निवास्थानाकडे जाणार्‍या रस्त्यावरच पोलिसांनी बॅरिकेट्‍स लावून रस्ता अडविला होता. 

प्रथम मुख्य रस्त्यावर आंदोलकांना रोखण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करुन पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही निवास्थानाकडे जाणारच अशी भुमिका घेतली. मुख्य रस्त्यापासून मोरे कॉलनीकडे जाणार्‍या रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आंदोलकांनी झटापट करीत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर सुरु केला. येथून पुढे जाऊ देणार नाही, अशी कडक भूमिका घेतली. सीमा प्रश्‍नासंदर्भात समन्वय मंत्री पदाची जबाबदारी असणार्‍या नेत्याने असे कर्नाटकचे गोडवे गावून बेळगावमधील सीमाबांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.