Mon, Aug 19, 2019 05:14होमपेज › Kolhapur › आरक्षण देण्याशिवाय सरकारला पर्याय नाही : नितेश राणे 

आरक्षण देण्याशिवाय सरकारला पर्याय नाही : नितेश राणे 

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 07 2018 11:41PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणार्‍या मराठा आरक्षणाची दखल राज्यकर्त्यांनी न घेतल्याने अवघ्या महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा समाज एक होऊन रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाची अंतिम लढाई लढण्यासाठी तो आता सज्ज झाला आहे. सकल मराठा क्रांती ‘मूक’ मोर्चाची जागा ‘ठोक’ मोर्चाने घेतली आहे. आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी नाही. यामुळे जनक्षोभ उसळण्यापूर्वी मराठ्यांना आरक्षण देण्याशिवाय सरकारला दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी केले. 

ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असणार्‍या मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनाच्या 14 व्या दिवशी (मंगळवारी) आ. राणे यांनी पाठिंबा देऊन सहभाग घेतला. यावेळी बोलताना आ. राणे म्हणाले, शाहूनगरी कोल्हापुरातूनच मराठा आरक्षणाचा पहिला मेळावा झाला. मराठा आरक्षणासाठी राज्यभर निर्माण झालेले वातावरण आणि राज्य सरकारवर दबाव आणण्याचे काम सकल मराठा आरक्षण आंदोलनामुळेच झाले आहे. पक्षभेद विसरून मराठा म्हणून सर्वजण एकत्र आले आहेत. या दबावामुळेच गल्लीपासूनच दिल्लीपर्यंत बैठका सत्र सुरू आहे. 

चॅप्टर केसेसच्या प्रकारांनी उद्रेकास ठिणगी

राज्यभर सुरू असणार्‍या मराठा आरक्षण आंदोलनातील लोकांवर चॅप्टर केसेस, 307 सारखे गंभीर गुन्हे टाकण्याचे काम सरकार करत आहे. यामुळे उद्रेकात ठिणगी टाकण्याचे काम राज्य सरकार व पोलिसांकडून होणार आहे. अशा प्रकारामुळे आंदोलनावर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही. तसेच होणार्‍या उद्रेकास सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार राहील, असा इशारा आ. नितेश राणे यांनी दिला.
शिवसेनेचे धोरणही आरक्षण न मिळण्याचे एक कारण अनेक वर्षे लोटली तरी मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही, यासाठीच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे शिवसेनेची सत्ता असल्याचा आरोप आ. राणे यांनी केला. सेनेचे प्रमुख ठाकरे यांच्या धोरणानुसार त्यांची आर्थिक निक0षावर आधारित आरक्षणाची मागणी आहे. 

आमदारांनी मैदान सोडू नये

शिवछत्रपतींनी मराठ्यांना लढणे शिकविले आहे. यामुळे 145 च्या संख्येने असणार्‍या आमदारांनी राजीनामे देऊन पळून न जाता अधिवेशनांना उपस्थित राहून, कायद्याचा अभ्यास करून आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. राणे यांनी केले. मराठा, धनगर, मुस्लिम  समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केवळ मराठा समाजच नव्हे तर धनगर, मुस्लिम व इतर समाजांच्या आरक्षणासाठीही आपण त्यांच्या सोबत राहू, अशी ग्वाही आ. नितेश राणे यांनी दिली. इतर आंदोलनांशी मराठा समाजाच्या आरक्षणाची तुलना करू नये. नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ मागून आणखी आत्महत्या  व्हायची वाट न पाहता तातडीने आरक्षणाची  घोषणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.  शिवछत्रपतींचे मावळे कधीच  आत्महत्या करणार नाहीत ज्यांच्या मनात शिवछत्रपती आहेत, ज्यांच्या घरात शिवरायांचा फोटो आहे ते लोक कधीच आत्महत्या करणार नाहीत. शहाजीराजे भोसलेेे, राजमाता जिजाऊ, शिवछत्रपती, शंभूराजे, रणरागिणी ताराराणी  यांचा स्फूर्तिदायी इतिहास वाचणारे लोक कधीही आत्महत्या करणार नाहीत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ज्यांच्या रक्तात हा  इतिहास आहे ते कधी स्वत:ला गाढू शकत नाहीत. तुम्हाला गाढायचेच असेल तर सरकारमधील गद्दारांना गाढा, असे आवाहन आ. राणे यांनी केले.  

दसरा चौकातून...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेली चौदा दिवस ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून जथ्थेच्या जथ्थे दसरा चौकात येऊन आंदोलनास पाठिंबा देत आहेत. आरक्षणासाठी रांगड्या आणि ओघवत्या शैलीत तरुणांसह नेतेमंडळी सरकारवर तोंडसुख घेत आहेत. 

आरक्षण ही काळाची गरज : आ. जाधव 

आरक्षणासाठी प्रसंगी त्यागास आम्ही तयार आहे. आरक्षणाचे श्रेय कोणाला जाईल यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा समाजाचा अंत पाहू नका. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या जिभेला लगाम लावणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण घेऊनही मराठा समाजातील मुलांची आर्थिकदृष्ट्या ससेहोलपट होत आहे. आरक्षणासाठीची ही अंतिम लढाई आहे, असेही आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. 

सुरक्षा सरकार नव्हे पोलिस करतात : जगताप 

आपली लढाई आरक्षणासाठी आहे. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांवर हात उचलू नयेत. आम्हाला माहिती आहे की, तुमचा संयम सुटत चाललाय, पण शांत डोेक्यानं आणि गनिमी काव्याने आरक्षणाची लढाई जिंकायची आहे. आपली सुरक्षा सरकार नव्हे तर पोलिस बांधव करणार आहेत. हे सर्वांनीच लक्षात ठेवावे. मराठा आरक्षणाच्या पर्श्‍वाभूमीवर पोलिस खात्यामधील मराठा अधिकार्‍यांच्या बदल्या केल्याचेही मराठा महासंघाचे दिलीपसिंह जगताप यांनी सांगितले. 

आरक्षण अंमलबजावणीपर्यंत लढू : सावंत 

आरक्षणाची लढाई ही केवळ राज्य शासनाकडून आरक्षण जाहीर होईतोपर्यंत सुरू राहणार नाही तर त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आम्ही लढणार आहोत. सर्व जाती-धर्मीयांनी मोठा भाऊ असणार्‍या मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्यासाठी बळ दिले आहे. तरुण मित्रांनी आत्महत्या करून जीवन संपवू नये, असे आवाहनही इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केले.

9 ऑगस्ट अंतिम नव्हे; आम्ही लढणारच : मुळीक 

वसंतराव मुळीक म्हणाले, ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने ताकदीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्राचे लक्ष कोल्हापूर आहे, कारण कोल्हापूर म्हणजे चळवळीचे केंद्र आहे. जिल्ह्यात शांततेत आंदोलन सुरू आहे. आरक्षणाबाबत जनजागृतीसाठी 32 परिषदा घेतल्या. तरीदेखील सरकारला जाग आलेली नाही. आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील मुले आत्महत्या करत आहेत. आत्महत्या होऊ नये यासाठी प्रबोधनाची चळवळ उभी करत आहोत. 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद राहणार असून ही तारीख अंतिम नव्हे. आरक्षणाचा निर्णय होईतोपर्यंत लढायचेच, असेही ते म्हणाले. 

समाजाला बदनाम करण्याचे षड्यंत्र : देसाई

दिलीप देसाई म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल याचे पुरावे सरकारला दिले आहे, पण आरक्षण देण्याऐवजी सकल मराठा समाजाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आडवे येणार्‍याला आम्ही सळो की पळो करून सोडल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

हिसकावून आरक्षण घेऊ : सूर्यवंशी 

गेली अनेक वर्षे आरक्षणासाठी मराठा समाजबांधवांचा लढा सुरू आहे. महाराष्ट्रातून 58 मूक मोर्चे शांततेने निघाले. या मोर्चाची संपूर्ण देशाने कौतुक केले; पण सरकारने आरक्षणाचा प्रश्‍न गांभीर्याने घेतलाच नाही. आता त्वरित आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावला नाही तर चाबकाचे फटके मारू असे सांगून करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी चाबूक उगारत सरकारचा निषेध केला. 

लढून आरक्षण घेऊ : तोडकर 

आरक्षणासाठी आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरलो आहे. आरक्षण हे आमच्या हक्काचे असून  ते मिळविणारच.जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढतच राहू. शांततेच्या मागे अशांततेली धग असते हेही सरकारने लक्षात घ्यावे, असे सचिन तोडकर यांनी सांगितले. 

सरकार सुस्त : हर्षल सुर्वे 

गेली चार वर्षे सरकार झोपेचे सांग घेत आहे.मराठा आरक्षणासाठी गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे.पण सरकारने हा प्रश्‍न गांभीर्याने घेतलेला नाही.फक्त चर्चेला बोलवून आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.आरक्षणाची लढाई आम्ही जिंकूच असा विश्‍वास देखील हर्षल सुर्वे यांनी सांगितले. 

आमची ऐकी कायम : उमेश पोवार 

मराठा समाजाच्या आरक्षणात राजकारण आणू नका.आरक्षण कसे देता येईल याचे सर्व पुरावे आम्ही सादर केले आहेत. आरक्षणा पेक्षा आंदोलकांत फुट पाडण्याचा सरकारचा डाव आहे.आरक्षण घेतल्या शिवाय माघार नाही.आमची ऐकी कायम असून यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार उमेश पोवार यांनी व्यक्त केला.