Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Kolhapur › कोल्हापूर बंदला गालबोट लागू नये

कोल्हापूर बंदला गालबोट लागू नये

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 07 2018 12:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सरकारच्या दबावाला बळी न पडता गुरुवारी क्रांतीदिनी कोल्हापूर जिल्हा बंद राहणार, असा ठाम निर्धार आंदोलन संयोजन समितीच्या प्रमुखांनी पोलिस प्रशासनासोबत बैठकीत केला. सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागू नये, बंद शांततेत व संयमाने पाळला जावा, यासाठी आंदोलनप्रमुखांनीच कार्यक्रर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे; अन्यथा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवेल, अशी भीती पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली.

दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे आंदोलक आणि पोलिस प्रशासन यांची बैठक झाली. यावेळी नांगरे-पाटील बोलत होते. नांगरे-पाटील म्हणाले, पुरोगामी विचारांच्या शाहूनगरीला एक वेगळी परंपरा आहे.सर्व जातीधर्मांचे लोक येथे गुण्या गोविंदाने नांदत आहेत. यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला सर्व जातीधर्मांचा पाठिंबा मिळाला आहे.कोल्हापुरात लोकशाही मार्गाने सुरू असणार्‍या सकल मराठा क्रांती ठिय्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. गुरुवारी (दि. 9 ऑगस्ट) येथे मराठा आरक्षणासाठी बंद पुकारण्यात आला आहे. तो यशस्वी करण्याचे आवाहनही नांगरे-पाटील यांनी केले.

नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले, हा राजस्तरीय बंद असला, तरी कोल्हापूर जिल्ह्याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. गावागावांतील तरुण भडकला आहे. त्यांना संयोजकांनी शांत राहण्याचे आवाहन करावे. पोलिस प्रशासनदेखील त्यांचे प्रबोधन करत आहे. यामधून निश्‍चित शांतता प्रस्थापित होऊन गुरुवारचा बंद यशस्वी होईल. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडून आंंदोलकांत फूट पाडण्याचाही प्रयत्न होत आहेत.कोण काही म्हणोत, बंद होणारच, असे परखड शब्दांत त्यांनी जाहीर केले. वसंतराव मुळीक म्हणाले, ठोक मोर्चाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. ठोक या शब्दामुळे तरुण आक्रमक झाला आहे; पण गुरुवारचा बंद शांततेत होईल, असे सांगितले. ठोक हा शब्द सरकार विरोधात भाषणे ठोका या अर्थाने आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, फत्तेसिंह सावंत,जयेश कदम, स्वप्निल पार्टे, प्रसाद जाधव, विनाकय फाळके, आमदार सुरेश साळोखे, गुलाबराव घोरपडे, राजेश चव्हाण यांनी सूचना मांडल्या.