Tue, Mar 19, 2019 05:41होमपेज › Kolhapur › आमदार कुपेकरांच्या निवासावर मोर्चा

आमदार कुपेकरांच्या निवासावर मोर्चा

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 07 2018 11:34PMनेसरी : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंगळवारी कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या निवासावर मोर्चा काढून आंदोलकांनी घोषणाबाजी केली. आ. कुपेकर यांनी आरक्षणासाठी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. 

सकाळी मराठा समाजाचे कार्यकर्ते कानडेवाडी येथे जमले. कानडेवाडी फाट्यापासून आमदार कुपेकर यांच्या निवासस्थानापर्यंत ‘एक मराठा... लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे...’ अशी घोषणाबाजी करीत कानडेवाडी गाव दणाणून सोडला. निवासस्थानासमोर एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांचे सभेत रुपांतर झाले. यामध्ये पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, राजेश पाटील, किरण कदम, दिलीप माने, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रभाकर खांडेकर, अलका भोईटे, अ‍ॅड. संतोष मळवीकर, सूरज आसवले, प्रसाद हल्ल्याळी यांची भाषणे झाली.

आ. कुपेकर म्हणाल्या, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मी सुरुवातीपासून सहभागी आहे. विधानसभेतही मी हा मुद्दा मांडला आहे. आपल्या सर्वांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. वेळ पडली तरी राजीनामा देईन. मीही मराठा असून समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही माझी भावना आहे. मोर्चात गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, महिला सहभागी झाले होते.