Tue, Jul 16, 2019 00:23होमपेज › Kolhapur › कोल्हापूर आज बंद

कोल्हापूर आज बंद

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. 9) क्रांतिदिनीच कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, सहकारी संस्था, एस.टी., केएमटीसह वडाप, दूध संकलन, रिक्षा, स्कूल बस, बाजारपेठा, चित्रपटगृहातील पहिला खेळ बंद राहणार आहे.

दरम्यान, या बंदमधून हॉस्पिटल, मेडिकल दुकानांबरोबरच पेट्रोल पंपांना वगळण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. या मोर्चाला विविध घटकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने अलीकडच्या काही काळातील हा कडकडीत बंद ठरण्याची शक्यता आहे. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या  पंधरा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात ठिय्या आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात हे आंदोलन सुरू आहे. दसरा चौकात सभा सकाळी नऊ ते 11 पर्यंत उपनगर व भागाभागातील मराठा कार्यकर्ते आपल्या भागात बंदचे आवाहन करतील. त्यानंतर 11 वाजता सर्व कार्यकर्ते दसरा चौकात येतील. दसरा चौकात राष्ट्रध्वजाचे वंदन आजी-माजी सैनिक, वीरमाता व लष्करी अधिकारी यांच्या हस्ते होईल. त्यानंतर राष्ट्रगीत होईल. शाहिरी कार्यक्रम होणार असून, यात शाहू गौरव गीत, महाराष्ट्र गीत, मराठा बटालियन युद्ध गीत आणि आरक्षण गीत होईल. यानंतर शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सभा होईल. त्यात ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, मराठा सेवा संघाचे सौरभ खेडेकर यांची भाषणे होतील. त्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत ठिय्या, असे या बंदचे स्वरूप आहे. दसरा चौकाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत.

वृत्तपत्र विक्रेत्यांचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर शहरातील सर्व वृत्तपत्र विक्रेते संघटनांनी बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र, आंदोलकांच्या माहितीसाठी व जनतेच्या सोयीसाठी वृत्तपत्रांचे स्टॉल सुरू राहतील, असे कळविले आहे.

साखर कारखाने बंद; ‘गोकुळ’चे संकलन बंद

बंदला बहुतांशी साखर कारखान्यांनी पाठिंबा दिला असून, कामकाज बंद ठेवून कर्मचारी, अधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. भोगावती, दूधगंगा-वेदगंगा- बिद्री, राजाराम-बावडा आदींनी गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. इतर कारखान्यांनीही हा निर्णय घेतल्याचे समजते. ‘गोकुळ’ने गुरुवारी सकाळी एकवेळचे दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.