होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा बंद करा

कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा बंद करा

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 08 2018 12:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून 9 ऑगस्ट रोजी पुकारलेला बंद शांततेच्या मार्गाने करा, कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेला गालबोट लागणार नाही, या परंपरेला साजेसा हा बंद करा, असे आवाहन आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शासकीय अधिकारी, पोलिस व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आले. 

दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून 9 ऑगस्ट रोजी दिवसभर दसरा चौकात ठिय्या आंदोलन होईल, आंदोलनाचा पुढील निर्णय राज्य पातळीवर जो होईल त्याची अंमलबजावणी कोल्हापुरात होईल. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा विश्‍वास या बैठकीत कार्यकर्ते व प्रमुख नेत्यांनी दिला. 

शाहू महाराज म्हणाले, सर्व समाजाच्या सहकार्याने मराठा समाजाचे आंदोलन जोमाने सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष झाले. म्हणून आता आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. 9 ऑगस्टचा बंदही शांततेत होईल. त्यासाठी शासन व प्रशासनाचे सहकार्य आवश्यक आहे. शासनाने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षण देण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगतात, मग निर्णय लवकर का होत नाही. 

दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, आपल्याला कायमस्वरूपी सर्व पातळीवर टिकणारे आरक्षण हवे आहे. ज्या ज्या चळवळी कोल्हापुरात झाल्या, त्या महाराष्ट्रभर यशस्वी झाल्या हा इतिहास आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेत घटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये हे आरक्षण कसे बसवता येईल यावर चर्चा झाली आहे. आज उच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाने 15 नोव्हेंबरपर्यंत अहवाल देण्याची सूचना केली आहे.

देशात शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 पहिल्यांदा 50 टक्के आरक्षण दिले. त्यात ब्राह्मण वर्ग सोडून इतरांना आरक्षण, त्यात मराठा समाज होता. ज्यावेळी महाराजांना वाटले यात सर्व घटक येत नाही, त्यावेळी त्यांनी 1920 मध्ये हे आरक्षण 90 टक्के केले. हे आरक्षण संस्थानापुरते मर्यादित होते. आपण आरक्षण कशासाठी आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक मागतो, आपण राजकीय आरक्षण मागत नाही. 1978 ला मंडल आयोग आला. ज्या जाती सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांचा अभ्यास करून किती आरक्षण द्यायचे ही जबाबदारी या आयोगावर होती, पण दुर्दैवाने आयोगाने अभ्यास न करता 1931 च्या जनगणनेनुसार 52 टक्के आरक्षण दिले गेले. याच आयोगाने 1980 साली ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले. त्यावेळी मराठा समाजातील नेते, राजकीय पुढारी हे जागरूक असते तर या आयोगासमोर समाजाची बाजू मांडून त्याचवेळी हा प्रश्‍न सोडवू शकले असते, पण हे न झाल्याने मराठा समाज वंचित राहिला. 

ते म्हणाले, गेली 20 वर्षे मराठा समाजाची मागणी होत आहे. घटनेचे कारण देऊन हे आरक्षण नाकारले जाते, पण घटनेत 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देऊ नये, असे कुठेही लिहिलेले नाही. कायदेशीर कसोटीत बसणारे आरक्षण हवे, हे फक्त तामिळनाडूतील पेरियार समाजाला त्यावेळच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दिले.  महाराष्ट्रात आघाडी सरकारने आरक्षण दिले. कोल्हापूरकरांनी पेढे वाटून, गुलाल उधळून त्याचा आनंदोत्सव साजरा केला, पण त्याचा अध्यादेश काढताना गडबड झाली आणि त्यामुळे न्यायालयात ते टिकू शकले नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी थोडासा विचार करून तज्ज्ञांचा सल्ला घेतला असता तर त्यांनीही घटनेच्या 340 कलमानुसार मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेतल्याशिवाय हे आरक्षण देता आले नसते असे सांगितले असते. मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशिवाय एक दिवसही हे आरक्षण टिकणार नाही. एक तर परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट करून आरक्षण द्या किंवा संसदेत घटना दुरुस्ती करून हे आरक्षण देता येते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही लोकसभेत घटना बदलून घ्यावी, राज्यसभेत याला मंजुरी देण्याची जबाबदारी घेतली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. 

नऊ ऑगस्टचा बंद हा निश्‍चितपणे शांततेत होईल. मराठवाडा, चाकण येथे दंगल झाली, पण आमच्या लोकांनी शांततेत आंदोलन केले. कुठल्या पक्षाने दिलेल्या बंदच्या हाकेपेक्षा मराठा समाजाने दिलेली बंदची हाक फार मोठी आहे. आम्ही सर्व कोल्हापूरकर एवढे आश्‍वासित करतो हा बंद शांततेत होईल आणि तो तसाच व्हावा यासाठी पोलिस यंत्रणेचे सहकार्य रहावे. उद्याचा बंद हा व्यवस्थित झाला पाहिजे. पुढील आंदोलनाची दिशा शासन निर्णय काय होईल त्यावर ठरेल. इतर जिल्ह्यात काय निर्णय होईल तोच निर्णय कोल्हापुरात होईल, असेही डॉ. जाधव म्हणाले. 

नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी 9 ऑगस्टच्या बंदची रूपरेषा सांगितली. ते म्हणाले, सकाळी नऊ ते 11 पर्यंत सर्व शहर बंद करण्यात येईल. त्यानंतर शहरातील तरुण, नागरिक, महिला दसरा चौकात येतील. तिथे दिवसभर ठिय्या आंदोलन होईल. या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. 

प्रा. अनिल घाटगे म्हणाले, या आंदोलनाला कोणतेही गालबोट लागणार नाही ही सर्वांची जबाबदारी आहे. पोलिसांनी दसरा चौकात येणारे सर्व मार्ग वाहनांसाठी गुरुवारी बंद ठेवावेत. 

हर्षल सुर्वेे म्हणाले, या आंदोलनात बाहेरचे कोणी येऊन गोंधळ करण्याची शंका पोलिसांना असेल तर त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा. बंद हा होणारच आणि आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलनही थांबणार नाही. मराठा महासंघाचे वसंत मुळीक म्हणाले, या बंदला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सर्व स्तरातून या बंदला पाठिंबा मिळत असल्याने बंद करा, असे कोणाला सांगावे लागणार नाही. आरक्षणाचे जनक शाहू महाराजांची ही भूमी आहे, त्यामुळे राज्यात काहीही होऊ दे, कोल्हापुरात काय होणार नाही याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

दिलीप देसाई म्हणाले, आंदोलनासाठी आचारसंहिता केली आहे. नेत्यांच्या एका शब्दावर थांबणारे कोल्हापूर हे एकमेव शहर आहे. काही मंत्री दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येणार नाही याची खबरदारी जिल्हाधिकारी यांनी घ्यावी. आम्ही चुकलो तर जरूर सांगा, पण दबाव टाकण्याचा प्रयत्न सहन करणार नाही. 

आर. के. पोवार म्हणाले, हा प्रश्‍न नाजूक आहे. हा जिल्हा ऐतिहासिक आहे. या जिल्ह्यात झालेला निर्णय राज्यभर जातो, पण याबाबत चर्चा कोणासोबत करायची हेच माहीत नाही. आरक्षण देतो असे ठामपणे सांगा, आम्ही थांबतो. 

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार म्हणाले, दिलदार स्वभावाचा रांगडा माणूस अशी कोल्हापूरकरांची ओळख आहे. दिलेला शब्द पाळणारा माणूस या जिल्ह्यात आहे. त्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा शब्द दिला आहे, तो ते पाळतील, असा विश्‍वास मला आहे. 

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, कोल्हापूर हा आदर्श जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र या जिल्ह्याकडे पाहतो. आरक्षणाची सुरुवातच या जिल्ह्यात शाहू महाराजांनी केली, त्यामुळे या जिल्ह्यावरच जास्त जबाबदारी आहे. महाराष्ट्र एका वेगळ्या अपेक्षेने या जिल्ह्याकडे पाहतो, जिल्ह्याची हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी उद्याचा बंद शांततेत व्हावा. 

यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, नृसिंहवाडीचे सागर धनवडे, माजी नगरसेवक धनंजय सावंत यांनीही सूचना मांडल्या. सुरुवातीला या आंदोलनादरम्यान मयत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले. 

बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह सर्व पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक व मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.