Wed, Jul 17, 2019 12:55होमपेज › Kolhapur › सदाभाऊ खोत यांची बैठक उधळण्याचा प्रयत्न

सदाभाऊ खोत यांची बैठक उधळण्याचा प्रयत्न

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 1:38AMसरूड  :  वार्ताहर 

पिशवी (ता. शाहूवाडी) येथे कृषी राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या आढावा बैठकीमध्ये मराठा आरक्षण समर्थनार्थ व शासन निषेधार्थ काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बैठकीच्या दिशेने बांगड्या फेकत काळे झेंडे दाखवून ही बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलिसांनी या तरुणांना वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मंत्री खोत यांनी मात्र या आंदोलकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, मीही मराठ्याचीच औलाद आहे. गेल्या तीस वर्षांच्या चळवळीच्या संघर्षातून घडलेला कार्यकर्ता आहे. मला फक्त लढायचे माहिती आहे, रडायचे नाही. त्यामुळे अशा पोकळ घोषणाबाजीला  आपण भीक घालत नाही. आम्हीही अनेक आंदोलने केली; परंतु ती सर्व लोकशाही मार्गाने केली. लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यास सर्वांनाच अधिकार आहे; परंतु अशा प्रकारे हुकूमशाही व ठोकशाही मार्गाचा अवलंब करणे निंदणीय आहे. मराठा समाजाच्या आरक्षणास माझा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. माझ्यासह सर्व पक्षांचे मराठा समाजातील लोकप्रतिनिधी मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्नशील असल्याचे सांगत लवकरच या प्रश्‍नावर तोडगा निघेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पिशवी येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकार्‍यांची विविध विकासकामांसंदर्भात व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महादेव मंदिराच्या हॉलमध्ये आढावा बैठक  आयोजित करण्यात आली होती. मराठा आरक्षण प्रश्‍नी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीदरम्यान गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

आढावा बैठकीला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच सचिन मुडशिंगकर, कृष्णात दिंडे, सुरेश म्हाऊटकर, तुषार पाटील, सतीश तेली, विजय लाटकर (सर्व रा. बांबवडे, ता. शाहूवाडी) यांनी अचानक मंदिराच्या प्रवेशद्वारा शेजारी येत मराठा आरक्षण समर्थनार्थ व शासन निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी बैठकीच्या दिशेने बांगड्या फेकल्या व काळे झेंडे दाखवत बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी  त्वरित या सर्वांना ताब्यात घेतले. त्यानंतर आढावा बैठकीस सुरुवात झाली.