Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Kolhapur › 23 आत्महत्या तरी सरकारला जाग नाही?

23 आत्महत्या तरी सरकारला जाग नाही?

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 07 2018 12:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी राज्यातील 23 तरुणांनी आत्महत्या केल्या, तरी सरकारला जाग का येत नाही? असा सवाल करून, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ अशा घोषणा देत मिरजकर तिकटी येथे रास्ता रोको आणि मानवी साखळी करण्यात आली. 

सकल मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारी मंगळवार पेठेतर्फे मिरजकर तिकटी येथे रास्ता रोको आणि मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर सुरू असणार्‍या या आंदोलनामुळे संपूर्ण शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. आठवड्याचा पहिला दिवस आणि नोकरी-व्यवसाय, शाळा सुरू होण्याची आणि महाविद्यालये सुटायच्या वेळी 11 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन झाल्याने, यानंतर सुमारे दोन-तीन तास संपूर्ण शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. 

मिरजकर तिकटी येथील हुतात्मा क्रांती स्तंभ आणि ‘आझाद हिंद’ सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतींना अभिवादन करून, तसेच आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकांना श्रद्धांजली वाहून आंदोलनास सुरुवात झाली. यानंतर हलगीवादक संजय तथा बापू आवळे यांच्या पथकाने हलगीवादन करून वातावरणनिर्मिती केली. मंगळवार पेठेतील विविध तालीम संस्था-तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला-विद्यार्थी व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मिरजकर तिकटीला शहराच्या विविध भागांतून जोडणारे सर्व रस्ते अडविण्यात आले. भरपावसात साखळी करून आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. रणहलगी-घुमके-कैचाळीच्या आवाजात घोषणाबाजी सुरू होती. भगवे ध्वज, ‘एक मराठा-लाख मराठा’चे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी हातात हात घालून मानवी साखळी केली. 

यावेळी विजय देवणे, संभाजीराव जगदाळे, अशोक पोवार, बाबा पार्टे, स्वप्निल पार्टे, प्रसाद जाधव, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अ‍ॅड. जयश्री चव्हाण, अदिल फरास, उत्तम कोराणे, राजू जाधव, निवास शिंदे, किरण जाधव, राहुल चव्हाण, बाबुराव चव्हाण, सुनील खिरुगडे, उदय पाटील, अनिल गुरव, गजानन यादव, अजित सासने, बाबा जामदार, बाळासाहेब पाटील, श्रीकांत माने, अजित पोवार, शिवाजी डवंग, मदन चोडणकर, राजेश पाटील, मनोज जगताप, जीवन चोडणकर, दत्ता हुजरे आदींसह नागरिक, मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळ व रिक्षा मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

मराठा समाज बांधवांनी संयम राखावा : घाटगे

मराठा आरक्षणाचा निर्णय घेेताना तो कायद्यात बसवणारच; पण तोपर्यंत महाराष्ट्रात होणार असलेली नोकर भरती थांबवणार, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नोव्हेंबरपर्यंत मराठा बांधवांनी संयम राखणे गरजेचे आहे. तसेच 9 ऑगस्टचा ‘महाराष्ट्र बंद’ शांततेने  पाळावा, असे आवाहन मराठा संघटनेचे बाळ घाटगे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. मराठा संघटनेने मराठा आरक्षणासाठी 1979 पासून आंदोलने, उपोषणे, मोर्चेे, मेळाव्यांचे आयोजन केले आहे. 2018 पर्यंत मराठा जागृती करून आरक्षण आंदोलनाची धग तेवत ठेवल्याचे पत्रकात म्हटले आहे.