Thu, Apr 25, 2019 23:51होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कुरुंदवाड येथे ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कुरुंदवाड येथे ठिय्या आंदोलन

Published On: Aug 08 2018 12:34PM | Last Updated: Aug 08 2018 12:34PMकुरुंदवाड : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असून कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे आजपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच उद्या होणाऱ्या  ठोक मोर्चा आंदोलनामध्ये सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

ठिय्या आंदोलनावेळी उपस्थित मराठा समाजबांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढली. यामध्ये आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. रॅली भालचंद्र चौकात आल्यानंतर तेथेच ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

या आंदोलनावेळी मराठा समाजाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य महिपतराव बाबर म्हणाले की, मराठा समाजामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मराठा समाजातील गोर गरिबांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. आता लवकर मराठा समाजाला आरक्षण घोषित करावे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान आंदोलनस्थळी आमदार उल्हास पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. तसेच शहरातील विविध संस्था संघटनांनीही या आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.